बोगस लसीकरणाचे बारामती कनेक्शन

मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या कोरोना लसीकरणाच्या बोगस शिबिराचे बारामती कनेक्शन उघड झाले असून एका आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे.

लस म्हणून दिले भेसळयुक्त द्रव्य

मुंबईत झालेल्या बोगस लसीकरण प्रकऱणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजेश पांडे असे आहे.

राजेश याने मुंबईत भेसळयुक्त द्रव हे कोविडची लस असल्याचे भासवून नागरिकांसाठी लसीकरण केलं होतं. सोबतच वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे नागरिकांना प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली होती.

मुंबईला आणणार

आरोपी राजेश पांडे याला बारामतीतील भिगवण रोडवरील अमृता लॉजवरून पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला अटक करण्यात आल्यावर मुंबईतील कांदिवली पोलिसांची टीम आरोपीला ताब्यात घेण्यासाठी बारामतीकडे रवाना झाली आहे. लवकरच आरोपीला मुंबईत आणले जाणार आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

30 मे 2021 रोजी कांदिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीत लसीकरण करण्यात आले होते. सोसायटीमधील 390 सदस्यांकडून प्रत्येकी 1260 रुपये घेत कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली होती.

लसीकरणानंतर सोसायटीतील नागरिकांनी प्रमाणपत्राची मागणी केली असता लसीकरण आयोजकांनी लस घेतलेल्या सदस्यांची माहिती घेतली. त्यानंतर या सदस्यांना विविध रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये लस घेतल्याचे प्रमाणपत्र दिले. या प्रकरणी कांदिवली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.