बारामती – राज्यातील मुसळधार पावसामुळे काही दिवसांपूर्वी पुणे- सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा (Traffic Problems) लागल्या होत्या. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाल्याचे पाहायला मिळाले. आणि याच वाहतूक कोंडीचा फटका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना देखील बसला. सुप्रिया सुळे यांनी अखेर थेट रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा व्हिडिओ सोसवल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

“हडपसर ते सासवड या पालखी महामार्गाकडे तातडीने अगदी ‘टॉप प्रायोरिटी’वर लक्ष देण्याची गरज आहे. या रस्त्याची प्रचंड अशी दुरवस्था झाली असून सातत्याने येथे वाहतूक कोंडी होते.

आता तर अशी अवस्था आहे की येथे एक गाडी जरी बंद पडली तरी प्रचंड अशी वाहतूक कोंडी होते”. असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी यावेळी केलं होत.

दरम्यान, आता सुप्रिया सुळे यांच्या नंतर वाहतूक कोंडीचा फटका थेट प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांना बसला असून, यावेळी बारामतीची वाहतूक कोंडी (Baramati Traffic Issue) सोडवण्यासाठी खुद्द प्रतिभा पवार रस्त्यावर उतरल्याचा एक फोटो समोर आहे.

व्हायरल झालेला हा फोटो मागच्या 2-3 दिवसातील असल्याचं बोललं जातं आहे. यावेळी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) रस्तावर उतरल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी तातडीने हालचाल करून येथील वाहतूक कोंडी दूर केली.

दरम्यान, बारामती शहरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिकांना हैराण केले असून पोलीस प्रशासन, आरटीओ आणि नगरपालिका या वाहतूक कोंडीवर मात करण्यास अपयशी ठरत आहेत. आणि फटका आता अनेक लोकांना बसत आहे.

बारामती शहरातून प्रशासन भवनमार्गे कसब्याकडे निघालेल्या असताना प्रतिभा पवार यांची गाडी वाहतूक कोंडीत अडकली. दहा ते पंधरा मिनिटे वाहतूक कोंडी दूर होत नसल्याचे पाहून स्वतः प्रतिभा पवार (Pratibha Pawar) गाडीतून खाली उतरल्या आणि त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने वाहनचालकांना सूचना दिल्या.

सामान्य नागरिकांना रोज या वाहतूक कोंडीचा फटका बसतोच. आता पवार कुटुंबातील महत्वाच्या व्यक्तिला देखील या वाहतूक कोंडीमुळं फटका बसला आहे. प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांचा हा फोटो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.

बारामतीतील मुख्य चौक असलेला तीन हत्ती चौकात पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांना रिंग रोडचा वापर करावा लागत असल्याने मुख्य चौकात वाहतूक कोंडी होत आहे. आणि दिवाळी असल्यामुळे सामान्य नागरिक नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत.