बारामती : स्वंयशिस्त पाळली, तर कोरोनाचं आव्हान परतविता येते, हे बारामतीकरांनी दाखवून दिले. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना बारामतीकरांनी मात्र शिस्तीच्या जोरावर कोरोनामुक्तीच्या दिशेने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे.
बारामतीत आज कोरोना रुग्णांची पॉझिटीव्हीटी अवघी दीड टक्के इतकी खाली आली आहे.
तपासण्या वाढविण्यावर प्रशासनाचा कल
बारामतीत काल केलेल्या 1201 तपासण्यांपैकी अवघे 17 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. एकीकडे तपासण्यांची संख्या वाढविण्याकडे प्रशासनाचा कल असून दुसरीकडे तपासण्या वाढूनही रुग्णसंख्या कमी होणे ही बारामतीसाठी दिलासादायक बाब मानली जात आहे.
व्यवहार सायंकाळी चार वाजेपर्यंत
बारामतीत ठराविक अपवाद वगळता इतर सर्वच व्यवहार सायंकाळी चार चारपर्यंत सुरू ठेवण्याची प्रशासनाने परवानगी दिली आहे.
त्यानंतर काही दिवसात रुग्णसंख्या वाढते की काय अशी शंका निर्माण झाली होती. प्रत्यक्षात बारामतीची परिस्थिती तुलनेने उत्तम आहे. रुग्ण सापडण्याचे प्रमाण आता नगण्य झाले आहे.
२१४ रुग्णांवर उपचार
बारामतीतील पाच कोविड केअर सेंटर सध्या सुरू असून यात 214 रुग्ण उपचार घेत आहेत. सुपे येथील केंद्रात नऊ, तर मोरगावच्या केंद्रात 12 रुग्ण आहेत.
रुग्णसंख्या घटली तर लवकरच ही दोन्ही कोविड केअर सेंटर बंद केली जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
बारामतीत सध्या 373 अॅक्टिव्ह रुग्ण असून व्हेंटीलेटरवर 23 तर ऑक्सिजनवर 52 रुग्ण उपचार घेत आहेत.