मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ ते ६ दरम्यान विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, आजारी, गरोदर आदी प्रवाशांच्या वाहतुकीसाठी विमानतळाच्या धर्तीवर ‘बॅटरी ऑपरेटेड कार’ सेवा सुरू केली; परंतु सेवेचे जादा दर आणि प्रशिक्षित चालकांची कमतरता यामुळे ही सेवा बंद पडली आहे.

दर कमी करण्यावर विचार

‘बॅटरी ऑपरेटेड कार’च्या सेवेचे दर परवडत नसल्यामुळे प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे या सेवेचे दर कमी करण्याच्या प्रस्तावावर रेल्वे प्रशासनाने विचार सुरू केला आहे. १ जून २०१९ पासून ही सेवा कार्यान्वित केली.

त्यासाठी प्रती प्रवासी ४० रुपये आणि प्रती बॅग १० रुपये, असा दर निश्चित करण्यात आला. एका कारमधून चालकासह सहा प्रवाशांची वाहतूक होऊ शकते.

Advertisement

इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारे हे वाहन असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे; मात्र त्याचे दर जास्त असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

किमान बॅगा तरी विनामूल्य न्या

या बाबत प्रवासी विकास साळवे म्हणाले ‘‘ही सेवा चांगली आहे; मात्र शुल्क कमी करावे लागेल. प्रत्येक प्रवाशासाठी ४० रुपये हे शुल्क जास्त आहे. एवढे पैसे घेता, तर किमान बॅगा तरी विनामूल्य घेतल्या पाहिजे.’’

दर कमी झाले, तर वापर करू

ज्येष्ठ नागरिक आनंद भिसे म्हणाले, ‘‘मला प्लॅटफॉर्मवर वयोमानामुळे वेगात चालणे शक्य नाही. त्यामुळे प्रवास करायचा असेल, तर मला किमान अर्धा तास लवकर स्टेशनवर यावे लागते. दर कमी झाले तर, बॅटरीवर चालणाऱ्या या कार माझ्यासाठी खरंच खूप उपयुक्त ठरतील.’’

Advertisement

चालकांमुळे सेवा बंद

या वाहनांची देखभाल करणाऱ्या बीव्हीजी कंपनीचे प्रतिनिधी म्हणाले, ‘‘आतापर्यंत पुणे रेल्वे स्थानकातील दोन्ही कार सुरू होत्या. ही वाहने ताशी १० किलोमीटर वेगाने जातात.

रेल्वेकडून भरती करण्यात आलेल्या वाहनचालकांनी योग्यप्रकारे काम न केल्यामुळे या कार बंद करण्यात आल्या आहेत. सध्या याचे व्यवस्थापन आमच्याकडे नाही.’’

सेवा लवकरच सुरू करू

पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर म्हणाले, “या बॅटरी कारचा विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना फायदा होत होता.

Advertisement

प्लॅटफॉर्मची दुरुस्ती, सरकता जिना बसवणे व विद्युत यांत्रिकीकरणांची कामे करायची असल्याने कोरोना काळात ही सेवा बंद करण्यात आलेली आहे. ती लवकरच सुरू करू.’’

 

Advertisement