राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नबाब मलिक आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महाराष्ट्रातील काही नेत्यांचा हात आहे, असा आरोप केला होता.

तिथल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच सरकार पाडण्याचा कोणीही प्रयत्न करीत नाही, असे सांगितल्याने या नेत्यांचे आरोप हास्यास्पद आणि कपोलकल्पित असल्याचे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले.

मी भाजपचा छोटा कार्यकर्ता

झारखंड पोलिसांनी बावनकुळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष पोलिस पथक त्याचा तपास करीत असल्याच्या बातम्या आल्या. त्यावर प्रथमच बावनकुळे यांनी माैन सोडले.

Advertisement

झारखंड काय, मी रांचीलाही कधी गेलो नाही, असं त्यांनी सांगितलं. सरकार पाडण्याएवढा मी मोठा राष्ट्रीय नेता नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे, असे ते म्हणाले.

संपूर्ण प्रकरण हस्यास्पद

सरकार पाडण्याबाबतचं हे संपूर्ण प्रकरण हस्यास्पद आहे. मी कधी रांची पाहिली नाही. तिथल्या एकाही आमदाराचा नंबर माझ्याकडे नाही.

मी महाराष्ट्रातील भाजपचा छोटा कार्यकर्ता आहे. सचिव आहे. हे सगळं कपोलकल्पित आहे, असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिलं.

Advertisement

भाजपला बदनाम केलं जातंय

पटोले यांनी माझ्यावर आरोप केला; पण आमचा एकही आमदार भाजपच्या संपर्कात नाही, हे आजच झारखंड काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी कबूल केलं आहे.

तसेच कोणत्याही आमदाराने सरकार पाडण्याचा प्रयत्न केला नसल्याचंही काँग्रेसच्या अध्यक्षानेच स्पष्ट केलं आहे. अशा पद्धतीने जाणीवपूर्वक अफवा निर्माण करून मला आणि भाजपला बदनाम केलं जात आहे, असा दावा त्यांनी केला.

ओबीसींचा फुटबॉल केला जातोय

या वेळी ओबीसी मोर्चाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बारामतीमधून ओबीसींचा एल्गार मोर्चा निघणार आहे. तो महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचेल.

Advertisement

राजकारण न करता भाजपचे नेते सरकारच्या मदतीला तयार आहेत. सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे ओबीसींचा डेटा तयार करावा. ओबीसी आयोग तयार झाला आहे. डेटा तयार करायला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागत नाही.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण थांबवलं नाही, केवळ डेटा तयार करण्याची सूचना केली; पण ओबीसींना आरक्षण द्यायचं मनात नसेल म्हणून ओबीसींचा फुटबॉल केला जातोय, अशी टीका त्यांनी केली.

 

Advertisement