डाॅक्टरांकडे समाज वेगळ्या नजरेने पाहतो. समाजात आदर असलेला हा घटक जेव्हा हाणामा-या करायला लागतो, तेव्हा त्याचे तीव्र पडसाद उमटत असतात. शिक्रापूरमध्येही असाच प्रकार घडला.

काय घडले ?

वीजबील थकले म्हणून मीटर बंद करणाऱ्या सहाय्यक अभियंत्यासह शिकाऊ महिला तंत्रज्ञाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या एका डॉक्टरसह चौघांवर सरकारी कामात अडथळा, मारहाण, शिवीगाळीचा गुन्हा शिक्रापूर पोलिसांनी दाखल केला.

दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या पुढील काळात कुणी आगळीक केल्यास आपण कठोरात कठोर पावले उचलणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

महिलाही मारहाणीत

पाबळ चौकातील संजीवनी हॉस्पिटलच्या शेजारी महावितरणचे साहय्यक अभियंता गणेश वगरे व शिकाऊ महिला तंत्रज्ञ संगीता शालीकराम तरोने यांना डॉ. ज्ञानेश्वर टेमक, संजय गव्हाणे, गीतांजली संजय गव्हाणे व विनायक माणिक साबळे यांचेसह निळ्या टी शर्टात वावरत असलेल्या एका युवकाने शिवीगाळ करून मारहाण केली.

वीज बील थकल्याने ते वीजजोड तोडत होते. संगीता तरोने यांचा मोबाईल हिसकावून फेकून देत त्यांचा हात पिरगळला. याबाबत वगरे यांच्या तक्रारीवरुन चारही आरोपींवर शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ, मारहाण आदी गुन्हे दाखल करण्यात आले.