आरोग्यमंत्र्यांच्या सोबत झालेल्या दुस-या बैठकीत आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला.

मानधनवाढ आणि कोविड भत्ता मंजूर

आशांना एक जुलैपासून एक हजार रुपये निश्चित मानधनवाढ आणि पाचशे रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय झाला आहे. आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने संप मागे घेत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीनंतर जाहीर केले.

गेल्या नऊ दिवसांपासून आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी बेमुदत संप करत होते; मात्र आज झालेल्या बैठकीनंतर या संपाबाबत चर्चा करत निर्णय घेण्यात आला असून 70 हजार कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला आहे.

Advertisement

२०२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

आशा वर्कर्सना 1 जुलैपासून निश्चित मानधनवाढ 1000 रुपये तसेच 500 रुपये कोविड भत्ता दिला जाणार आहे. अशी एकूण 1500 रुपये वाढ म्हणून मिळणार आहे. तसचे, गट प्रवर्तकांसाठी निश्चित मानधन वाढ 1200 रुपये आणि कोविड भत्ता 500 रुपये अशा पद्धतीने 1700 रुपये वाढवण्यात आले आहेत.

राज्यात 71,137 एवढी आशांची मंजूर पदे आहेत. त्यापैकी, 68 हजार 297 एवढी पदे भरलेली आहेत. गटप्रवर्तक तीन हजार 664 मंजूर पदांपैकी तीन हजार 570 पद भरलेली आहेत.

त्यामुळे, एकंदरीत गटप्रवर्तक आणि आशा सेविकांचे मिळून 202 कोटींचा खर्च प्रतिवर्ष अपेक्षित आहे. साधारणपणे पुढच्या वर्षी जुलै महिन्यात 500 रुपये वाढ देण्याच्या दृष्टीकोनातून मान्यता देण्यात आली आहे.

Advertisement

कमिटी स्थापन करणार

आशा वर्कर्सच्या समस्यांबाबत सेवाशर्ती, कामातील समस्यांबाबतच्या मानधनवाढी संदर्भातील समस्यांबाबत एक कमिटी स्थापन केली जाणार आहे.

आशा व गटा प्रवर्तकांच्या कामकाजाबाबत व सेवाशर्ती बाबत अभ्यास करण्यासाठी यशदाची समिती नियुक्त करण्यात येईल व या समितीवर आशा व गटप्रवर्तक संघटनांचे प्रतिनिधी असतील.

Advertisement