Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पीएमपीत प्रवास करणा-यांनो सावधान, चोर कधीही करू शकतो हातसफाई!

शहरात पीएमपी बस प्रवासी संख्येवरील निर्बंध शिथील केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

शहरातील प्रमुख पीएमपी स्थानके तसेच थांब्यांवर चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. असे असूनही चोरट्यांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे पीएमपीतून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.

मौल्यवान ऐवजही सांभाळण्याची कसरत

पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता भर गर्दीत स्वत:चा तोल सांभाळण्यासोबत आपला मौल्यवान ऐवजही सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे. गेल्या काही दिवसांत पीएमपीच्या प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.

Advertisement

नगर रस्त्यावरून पीएमपीने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेकडील सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली. याबाबत ७४ वर्षीय महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला तळेगाव ढमढेरे ते पुणे महापालिका भवन या मार्गावर बसने प्रवास करत होत्या.

चंदननगर येथील टाटा गार्डन परिसरात त्यांच्या गळ्यातील ३० हजारांची सोनसाखळी चोरट्याने लांबविली. काही वेळानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी आरडाओरडा केला; मात्र चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन पोबारा केला.

Advertisement

बसमधील गर्दी चोरांच्या पथ्यावर

गर्दी अससणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसमध्येच प्रवाशांचा ऐवज चोरल्याचे दिसून येत आहे. लांब पल्ल्याचा प्रवास असणाऱ्या बसना मोठी गर्दी असते. अशा बसमध्येच चोरटे प्रवाशाजवळ गर्दी करून त्यांचा मौल्यवान ऐवज चोरत आहेत.

चोरी करणारे टोळके असून, बसस्थानकापासूनच ते सावजाच्या शोधात असते. बसमध्ये चढताना किंवा उतरताना गर्दी करून चोऱ्या केल्या जातात. चोरीचा गुन्हा किरकोळ असल्याने पोलिसांकडूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

वाढत्या चोऱ्यांमुळे बसमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची सूचना पोलिसांकडून करण्यात आली आहे. पीएमपी प्रशासनाने मात्र, पोलिसांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली आहे.

Advertisement

 

Leave a comment