पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा (bharat jodo yatra) नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होत आहे. यासाठी राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. काँग्रेसने यासाठी जय्यत तयारी केली आहे.

दरम्यान, आता काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत (bharat jodo yatra) पुण्यातील (Pune) 1 हजार 150 पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात संबंधित पदाधिकारी हे सहभागी होणार आहेत.

यावेळी राज्यात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष कैलास कदम, यात्रेचे समन्वयक ॲड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी मंत्री रमेश बागवे उपस्थित होते.

ही यात्रा केवळ काँग्रेस पक्षाची रॅली नसून एका तिरंग्याखाली काढण्यात आलेली समविचारी पक्षाची आणि समविचारी नागरिकांची रॅली आहे.

या रॅलीला मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत असून ही यात्रा (bharat jodo yatra) संपूर्ण देशाला जोडणारी आहे, असे मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतंच व्यक्त केले आहे.

तर दुसरीकडे यावेळी या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेकडून पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी शिष्टमंडळाला सांगण्यात आले.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. भाई जगताप,

काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आ. अमरनाथ राजूरकर यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे तर सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली होती.

दरम्यान, ‘भारत जोडो’ यात्रा (bharat jodo yatra) वेळी पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणची माती आणि नद्यांचे पाणी एकत्रित केले जाणार असून त्याद्वारे यात्रेत वृक्षारोपण केले जाईल.

पिंपरी चिंचवडमध्ये तीन नोव्हेंबर रोजी पदयात्रा काढली जाणार आहे. यात्रेसाठी पिंपरीतील अडीच हजार पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केली आहे.