पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा (bharat jodo yatra) नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होत आहे. यासाठी राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. काँग्रेसने यासाठी जय्यत तयारी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ (bharat jodo yatra) महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होण्यापूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण तापतांना पाहायला मिळत आहे. सध्या या यात्रेची महाराष्ट्र कॉंग्रेसकडून जय्यत तयारी सुरू आहे.

भारत जोडो यात्रेत पुण्यातील 1 हजार 150 पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आणि याच पार्श्ववभूमीवर नुकतंच पुणे शहरातील शक्तीस्थळांवरील मातीचे संकलन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने

शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्ह्याचे भारत जोडो यात्रेचे समन्वयक ॲड. अभय छाजेड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पुणे शहरातील ऐतिहासिक व भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी सबंधित शक्ती स्थळांवरील माती सकंलन यावेळी करण्यात आले.

पुणे शहर हे ऐतिहासिक वारसा असलेले शहर असून छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या पुण्यातील लाल महालातून माती संकलन करण्यात आले.

त्यानंतर काँग्रेस भवन हे देखील स्वातंत्र्य पूर्व काळातील एक अग्रगण्य स्थान असून 1942 च्या चले जाव चळवळीमध्ये याच ठिकाणी देशातील पहिला हुतात्मा नारायण दाभाडे हे होते.

आद्य क्रांतीकारक उमाजीराजे नाईक यांना इंग्रजांनी ज्या ठिकाणी फाशी दिली, त्या मामलेदार कचेरी येथील त्यांच्या स्मारकातून माती संकलन केले.

स्वातंत्र्यपूर्व काळात समाज सुधारणेबरोबरच स्वातंत्र्याचे महत्व ज्यांनी पटवून दिले व स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी रचला अशा महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या ऐतिहासिक समाधी स्थळावरून (समताभूमी) येथून मातीचे संकलन केले.

महात्मा गांधीजींचे गुरू ना. गोपाळकृष्ण गोखले यांच्या राहत्या घरातून म्हणजेच गोखले इन्स्टिट्यूट गोखले स्मारक येथून माती संकलनीत करण्यात आली.

भारतीय स्वातंत्र्याचे जहाल नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांचे पुणे येथील राहते घर या ठिकाणाहून देखील माती संकलित करण्यात आली. आद्य क्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमंवाडी स्मारकाची माती संकलित करण्यात आली.

तसेच, छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक वढू ब्रु. येथून व भीमा कोरोगाव येथील विजय स्तंभ येथून व तळेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानातून मातीचे संकलन (Bharat Jodo Yatra) केले गेले.