पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा (bharat jodo yatra) नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही आज म्हणजेच, 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होत आहे. यासाठी राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसने यासाठी जय्यत तयारी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ (bharat jodo yatra) महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होण्यापूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण तापतांना पाहायला मिळालं आहे.

आज रात्री साधारण साडेसातच्या सुमारास त्यांचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आगमन होईल. यानिमित्ताने महाराष्ट्र काँग्रेसने नांदेड, देगलूरसह अन्य ठिकाणी यात्रेची जोरदार तयारी केली आहे.

सुरुवातीला तेलंगणा,कर्नाटक महाराष्ट्राच्या वेशिवरील मदनूर याठिकाणी तीन राज्यातील काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते भारत जोडो यात्रेचे या दरम्यान जंगी स्वागत करतील.

देगलूर येथील शिवाजी चौकातून ५० हजार कार्यकर्त्यांच्या जनसमुदायासह हातात मशाल घेऊन राहुल गांधी (Rahul Gandhi) पुढे मार्गक्रमण करतील. ते गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारा इथे जाणार आहेत.

राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील ‘भारत जोडो यात्रेचा’ (bharat jodo yatra) खरा प्रवास मंगळवारपासून सुरु होईल. यासाठी काँग्रेसचे राज्यभरातील कार्यकर्ते आणि नेते नांदेडच्या दिशेने रवाना होताना दिसत आहेत.

नांदेडमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या भोजनासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची ओळख असलेले खाद्यपदार्थ या भोजनात असतील.

यामध्ये थालीपीठ, आंबट वरण, बाजरीची भाकरी, पिठले, दही-धपाटे, शेवभाजी, वांग्याचे भरीत हा मेन्यू असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

भारत जोडो यात्रे निमित्त राहुल गांधींचे चार मुक्काम असणार आहेत. नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर १० नोव्हेंबर रोजी या यात्रेतील राज्यातील पहिली सभा होईल.

या सभेला काँग्रेस नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सध्या महाराष्ट्र कॉंग्रेसकडून जय्यत तयारी सुरू आहे. भारत जोडो यात्रेत पुण्यातील 1 हजार 150 पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.