लोणावळा – ऐन दिवाळीमध्ये भाऊबीज आणि पडावा सणाच्या दिवशी लोणावळा (lonavala) परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिवाळीच्या (Diwali) दिवसांमध्ये आपल्या मित्रांसोबत लोणावळ्यातील भुशी धरणावर (Bhushi Dam) फिरायला आलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन युवकाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दिवाळी पाडवा व भाऊबिजेच्या दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रोहन जोगिंदर लाहोट (वय 17, रा. घाटकोपर, मुंबई) असे या मुलाचे नाव आहे.

भुशी धरण परिसरात तो क्लासमधील शिक्षक आणि इतर सहा विद्यार्थी मित्रांसोबत रोहन हा लोणावळा येथे फिरण्यासाठी आला होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तो भुशी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये उतरला असताना पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडाला.

या घटनेची माहिती समजताच सणासुदीच्या दिवशी देखील लोणावळ्यात (Bhushi Dam) शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकातील सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी जात रेस्कू ऑपरेशन राबवत सदर मुलाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

सचिन गायकवाड सर, योगेश उंबरे, अशोक उंबरे, अमित भोसले, ओंकार पडवळ, सागर कुंभार, अमोल चिनुरे, राजेंद्र कडु, अजय मयेकर, अमोल परचंड, अमोल सुतार, सुनिल गायकवाड यांच्या पथकाने हे रेस्कू राबवत मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला.

दरम्यान, आता या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहरचे पोलीस नाईक शिंदे करत आहेत. ऐन सणासुदीच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मात्र त्याचवेळी आपला सण बाजूला ठेऊन मदतीसाठी पोचलेल्या शिवदुर्ग मित्राचे कौतुक देखील ऐकायला मिळत आहे.