साैदी अरेबियाच्या तीन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून नाणारला होत असलेल्या प्रकल्पावरून शिवसेनेत दुफळी झाली आहे.

स्थानिक गट नाणार प्रकल्पाचे समर्थन करीत होता, तर एक गट विरोधात होता. त्याची दखल घेतली न गेल्यानं प्रकल्प समर्थक गटानं भाजपत प्रवेश केल्यानं शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेची भूमिका अस्पष्ट

कोकणातील नाणार रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. शिवसेनेने नाणार प्रकल्पाविरोधात भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेच्या सत्तर कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली. तारळ, अनसुरे, मिठगावणे या गावातील हे कार्यकर्ते आहेत.

Advertisement

प्रवेश केलेले कार्यकर्ते हे शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या गटातील आहेत. राजापूर तालुक्यात रिफायनरी झाली पाहिजे, असे या कार्यकर्ते यांचे मत आहे; पण शिवसेनेची नवीन जागेबाबत भूमिका अद्यापदेखील स्पष्ट नाही.

त्यामुळे आता या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला कोकणात धक्का बसला आहे.

भूमिका स्पष्ट करावी लागणार

सोमवारी विधिमंडळाचे अधिवेशन असून त्याचा अगोदर कोकणात रिफायनरीबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्व परिस्थिती पाहता आता शिवसेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

Advertisement

‘शिवसेनेच्या डोळ्यासमोर काजवे चमकले असतील’

शिवसैनिकांच्या भाजप प्रवेशानंतर भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी शिवसेनेला टोला लगावला. राजा काजवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता शिवसेनेच्या समोर नक्कीच काजवे चमकले असतील, अशी प्रतिक्रिया जठार यांनी व्यक्त केली.

नाणार रिफायनरी प्रकल्प नेमका काय होता ?

कोकणातील निसर्गसंपन्न अशा रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित होता. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील १४ गावे आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील दोन गावांमध्ये प्रकल्पाचा विस्तार होणार होता.

१३ हजार एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार होता. नागरिकांचा विरोध असतानाही, या गावांमधील क्षेत्र १८ मे २०१७ रोजी आैद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं.

Advertisement

हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या नाणार रिफायनरी प्रकल्प उभारत असून, त्यांची संयुक्तपणे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड म्हणजेच आरआरपीसीएल कंपनी २२ सप्टेंबर २०१७ रोजी स्थापन करण्यात आली.