पुणे :- मुद्रांक शुल्कात कपात केल्याचा फायदा गृहबांधणी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात झाला. घरांची खरेदी विक्री वाढली. त्यामुळे महाराष्ट्राच्या महसुलातही मोठी भर पडली;
परंतु मुद्रांक शुल्क पूर्वीसारखे केल्यानंतर घरांची खरेदी थांबली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नोंदणी शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
गहाण खताचे प्रकार
गहाण खताचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी इक्विटेबल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेज यांचा सर्वाधिक वापर होतो. यापूवी इक्विटेबल मॉर्गेजसाठी ०.२ टक्के,
तर सिंपल मॉर्गेजसाठी ०.५ टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती. अनेकदा त्यामुळे नागरिकांना गोंधळ होत होता. त्यातून वारंवार लोकांना उपनिबंधक कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.
आता अर्धा टक्के शुल्क
दोन्ही प्रकाराच्या गहाण खतांसाठी पूर्वी जास्तीत जास्त एक टक्का किंवा तीस हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येत होते. ते आता अर्धा टक्के किंवा १५ हजार रुपये आकारण्यात येणार आहे.
मुद्रांकशुल्कातही एकसारखेपणा
सिंपल मॉर्गेजसाठी पाच लाख रुपयांच्या आत कर्ज असेल, त्यावर ०.१ टक्के आणि त्यावरील रकमेचे कर्ज असेल, तर त्यावर ०.५ टक्के स्टॅम्प ड्यूटी भरावी लागत होती.
सिंपल मार्गेज करणारा घटक हा प्रमुख्याने असंघटित क्षेत्रातील असतो. त्यामुळे त्यांना जादा स्टॅम्प ड्यूटी भरावी लागत होती.
सरकारने या सर्व गोष्टींचा विचार करून दोन्ही प्रकाराच्या गहाण खतांवर सरसकट ०.३ टक्केच स्टॅम्प ड्यूटी आकारावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.