मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. एनआयएने (NIA) याबद्दल महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यात मोदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी झालेल्या चकमकीबाबत चौकशी करण्यात आली. या चौकशीतून धक्कादायक माहिती उघडकीस आलीय. 24 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याला जैश-ए-मोहम्मदने (JeM) टार्गेट केलं होतं असं एनआयएने सांगितलं आहे.

तसेच, जैशचा म्होरक्या मसूद अजहर यानेच हा कट रचला होता, असंही एनआयएने म्हटलं आहे. त्यामुळे जैशच्या हिटलिस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं पाहायला मिळतंय.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर आत्मघाती हल्ला करण्याची व्यूहरचना आखली जात आहे. असं देखील काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होत. आणि त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत वाढ देखील करण्यात आली आहे.

मोदींच्या दौऱ्याच्या 48 तास आधी म्हणजे 21 आणि 22 एप्रिलच्या दरम्यान अतिरेकी आणि सैन्य दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत चार अतिरेक्यांना कंठस्थान घालण्यात आलं होतं. तर एक जवान शहीद झाला होता. तर 4 जवान जखमी झालेले.

या चकमकीप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. 12 अतिरेक्यांविरोधात हे आरोपपत्र तयार करण्यात आलंय. जम्मूत झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर एक गुप्त रिपोर्ट समोर आला आहे. हा कट खुद्द मसूद अजहर यानेच रचला होता, अशीही माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत वाढ :

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर होते. तर आज 21 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी उत्तराखंड दौऱ्यावर असून, 23 ऑक्टोबरला उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील दीपोत्सव कार्यक्रमात ते सहभागी होतील. यावेळी सगळीकडे कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.