पुणे – दिवाळीच्या (Diwali) कडची वाट धरली आहे. सध्या साप्ताहीक सुट्टी आणि दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. शाळेतील सहामाहीच्या परीक्षा संपल्या आहेत. तसेच दिवाळीला (Diwali) सुरुवात देखील झाली आहे. त्याआधी आलेल्या साप्ताहीक सुट्टीची संधी साधून अनेकांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याशिवाय, साप्ताहीक सुट्टी निमित्ताने सामान्य नागरिकांनी आता आपल्या घरचा रस्ता धरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विविध रेल्वेस्थानक तसेच बसस्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

असे असताना पुण्यातील रेल्वेस्थानकावर (Pune Railway Station) एक दुर्दैवी घटना घडली आहे. ऐन दिवाळीत रेल्वेस्थानकावर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. याआधी पुणे रेल्वेस्थानकात (Pune Railway Station) चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र तशी कोणतीही घटना घडलेली नसून मृत्यू झालेला प्रवाशी फलाट क्रमांक 1 वर आला होता. रेल्वेस्थानकात येताच त्याचा मृत्यू झाला आहे, मृत प्रवाशाचे नाव साजन मांझी (35) असून तो मूळचा बिहार राज्यातील रहिवाशी आहे.

दानापूर रेल्वेगाडी फलाट क्रमांक एकवरुन शनिवारी रात्री नऊच्या सुमारास रवाना होणार होती. त्यावेळी प्रवासी आणि त्याचे कुटुंबीय सर्वसाधारण डब्यात प्रवेश करत होते.

मात्र अचानक प्रवाशाला त्रास झाला आणि तो फलाटावरच कोसळला. बेशुद्धावस्थेतील प्रवाशाला लाेहमार्ग पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, आता त्याच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम ससून रुग्णालयात केले जाणार असून यानंतर मृत्यूचे खरे कारण समजणार आहे. पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यानी प्रत्यक्ष भेट देऊन कोणतीही चेंगराचेंगरी न झाल्याची माहीती दिलेली आहे.

काय? म्हणाले पोलीस अधिकारी…

ज्या प्रवाशाचा मृत्यू झाला, तो आजारी असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणले, दानापूर एक्स्प्रेसने नाव साजन मांझी (35) (रा. मूळगाव – राम जालान मांझी वार्ड नं 5 , कंटी नवादा बीथो गया बिहार) हे गेले 15 दिवसापूर्वी बिगारी कामाकरीता पुण्यात आले होते, मृत व्यक्ति हा आजारी होता.

दानापुर एक्सप्रेस गाडीत चढत असताना त्याला पूर्वीपासून दम्याचा त्रास असल्याने त्यास अचानक जोरात खोकला आला. त्याचा जीव घाबरा झाल्याने त्यास त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्याला खाली उतरवून मोकळ्या हवेसाठी रेल्वे पदपथावर घेवून आले

व त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला नंतर पोलिसांनी आणि नंतर रेल्वे स्थानकावरील डॉक्टरांनी तपासले असता त्याला मृत घोषित केले. त्याला कोणत्याही मारहाण अथवा दक्कबुक्कीची खुण नाहीत. त्यासोबत त्याचे नातलग आहेत, असे देखील अधिकारी म्हणाले.