Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

राजगड परिसरात फुलली जैवविविधता

पुणे : सह्याद्रीचा घाटमाथा म्हणजे जैवविविधतेचा नमुनाच. त्यातही राजगड परिसरात पहिल्या पावसानंतर अनेक दुर्मीळ, प्रदेशनिष्ठ वनस्पती फुलतात. या परिसरात सुमारे ३५० हून अधिक वनस्पतींची जैवविविधता आहे.

दुर्मीळ ठेवा अनुभवणे अविस्मरणीय

राजगड परिसर जैवविविधतेचा अनमोल ठेवाच आहे. अनेक वनस्पती पहिल्याच पावसात दर्शन देतात आणि नंतर पुढच्या वर्षीच्या पहिल्या पावसात फुलून येतात.

त्यामुळे राजगडावर पायी जाताना हा दुर्मीळ ठेवा अनुभवणं अविस्मरणीय आहे. वनस्पती संशोधक डॉ. श्रीनाथ कवडे आणि इतिहास अभ्यास दीपक वाटेकर यांनी या जैवविविधतेची पाहणी केली.

प्रदेशनिष्ठ वनस्पती

राजगडाच्या परिसरात अनेक प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत. ज्या फक्त त्याच ठिकाणी दिसतात. इतरत्र कुठेही नाहीत. त्यामुळे पायी चालत जाताना या आजूबाजूच्या वृक्ष-वेलींची माहिती घेत बालेकिल्ल्याकडे जायला हवे.

राजगड परिसरात परीसारखी दिसणारी आम्री, कोब्रा लिली, क्रिस्टीसोनी कलकाराटा, कप-बशी, हनुमान बटाटा, होया वाघाटी, स्कार्वी, इफिजेनिया स्टेलाटा, काटे चेंडू, पिसा, रानहळद, सिल्वर फर्न, टोपली स्कार्वी, वॉकिंग फर्न, जंगली आलं आदी वनस्पतींचे दर्शन राजगडावर जाताना होत आहे, अशी माहिती डॉ. श्रीनाथ कवडे यांनी दिली.

उंचीच्या निदर्शक

समुद्रसपाटीपासून सुमारे १३९५ मीटरवर राजगड आहे. त्यामुळे इथे अनेक वनस्पतींचा अधिवास आहे. शेषगिरीया सह्याद्रीका, कंदीलपुष्प, अबुटिलॉन रानडेई, डेल्फिनियम अशा प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत, तर काही उंचीच्या निदर्शक आहेत.

कारवी ही वनस्पती खूप आहे. जमिनीला धरून ठेवण्याचे काम ही करते. हा नैसर्गिक ठेवा जपणे आवश्यक आहे, असे डॉ. कवडे यांनी सांगितले.

Leave a comment