सोने,नाणे, पैशाअडक्याची चोरी होती. दिलकी चोरी हा आणखी एक भाग. ग्रामीण भागात बैल, शेळ्या-मेढ्यांची चोरी होते; परंतु आता मासे चोरी व्हायला लागले आहेत.
शेतकरी मत्स्यपालनाकडे वळाले आहेत. त्यांच्या शेतातील मासे चोरून नेण्याचे प्रकार वाढले असून इंदापुरात पाच लाखांचे मासे चोरीला गेले आहेत.
एक विचित्र चोरीची कहाणी
कोरोना काळात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. काही ठिकाणी वाहन चोरीच्या घटना घडत आहेत, तर काही ठिकाणी चैन स्नॅचिंग आणि घरफोडी सारख्या गंभीर चोरीच्या घटना घडत आहेत; मात्र इंदापूर तालुक्यात एक विचित्र चोरीची घटना घडली.
चोरट्यांनी इंदापूरच्या शेतकऱ्याच्या शेततळ्यातून तब्बल पाच लाखांचे मासे चोरले. या घटनेमुळे इंदापूरसह बारामती तालुक्यात खळबळ उडाली आहे.
चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
इंदापूर तालुक्यातील पोंधवडी गावात घडला आहे. पोंधवडीचे शेतकरी बापूराव पवार यांच्या शेततळ्यातून पाच लाखांचे मासे चोरीला गेले आहेत.
याप्रकरणी पोंधवडी येथील चार जणांविरुद्ध इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापूराव पवार यांच्या तक्रारीनुसार चोरीला गेलेल्या माशांची किंमत पाच लाखांपेक्षा जास्त आहे.
15 महिन्यांपूर्वी शेततळ्यात माशांचे बीज सोडले
शेतकरी बापूराव पवार यांनी त्यांच्या शेततळ्यात 15 महिन्यांपूर्वी सायफरनिस आणि चिलापी जातीच्या माशांचे बीज सोडले होते.
दरम्यान 7 जुलैला शेततळ्यातील मासे चोरीला गेल्याचे पवार यांच्या निदर्शनात आले. हे मासे शेजारीच असलेल्या लोकांनी चोरल्याची फिर्याद पवार यांनी दिली आहे. यावरून भिगवण पोलिसांनी चार जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शेतकऱ्याची प्रतिक्रिया
“आम्ही परंपरागत शेती करतो; पण वातावरणाच्या अनिश्चिततेमुळे आमचं शेतात अनेकदा नुकसान होतं. त्यामुळेच आम्ही शेतात 200 बाय 100 आकाराचं तलाव बनवलं.
त्याद्वारे आम्ही मासे पालनाचा कारभार सुरु केला,” असं बापूराव पवार यांनी सांगितलं. “आम्ही 15 महिन्यांपूर्वी सायफरनिस प्रजातीचे 5 हजार आणि चिलापी प्रजातीचे 7 हजार बीज सोडले.
माशांचं चांगलं संगोपन केल्यामुळे शेततळ्यातील मासे हे 300 ते 500 ग्रॅमचे झाले होते. शेततळ्यातील मासे विकण्यासाठी आम्ही व्यापाऱ्यांना भेटलो.
आमचा व्यापाऱ्यांसोबत व्यवहारही केला; पण जेव्हा मासे पकडायला गेलो तर तलावातून मासेच गायब होते. शेततळ्यातील मासे चोरीला गेल्याचं माझ्या लक्षात आलं,” असं ते म्हणाले.