Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

राज्यातील संवैधानिक व्यवस्था कोलमडल्याचा भाजपचा आरोप

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील संवैधानिक व्यवस्था कोलमडल्याचा अहवाल राष्ट्रपतींना पाठवण्याचे साकडे भाजपने घातले आहे.

कोण कोण भेटले राज्यपालांना ?

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने कोश्यारी यांची ङेट घेतली. ओबीसी आरक्षण पूर्ववत होईस्तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणीसुद्धा या वेळी राज्यपालांकडे एका स्वतंत्र पत्रातून करण्यात आली.

शिष्टमंडळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदींचा समावेश होता.

विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक टाळली जात असल्याचा आरोप

राज्यपालांनी स्वत: पत्र दिल्यानंतरसुद्धा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक टाळली जात आहे. खरे तर संविधानाच्या अंतर्गत व नियमानुसार ही निवडणूक घेण्यासाठी पत्र दिल्यानंतर ती निवडणूक घेणे हे संवैधानिक बंधन होते; पण त्याचे पालन होत नसल्याने, राज्यातील संवैधानिक व्यवस्था कोलमडल्याबाबत राष्ट्रपतींकडे अहवाल पाठवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

सात अधिवेशनांत कामाचा नीचांक

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, तौक्ते चक्रीवादळ, कोरोना, शिक्षणाचा बोजवारा, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था स्थिती या गंभीर विषयावर चर्चेसाठी सरकारला वेळ नाही.

आघाडी सरकारने ५७८ दिवसांतील सात अधिवेशन मिळून केवळ ३० दिवसांचे कामकाज केले, हा नीचांक आहे, असे शिष्टमंडळातर्फे राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a comment