file photo

पुणे : गेल्या काही दिवसांत शिवसेना-भाजप जवळ येण्याची चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबाँबने तर राज्यातील सरकार कोलमडते, की काय अशी शक्यता व्यक्त होत होती; परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेने भाजप शिवसेनेसोबत जायला तयार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

सरनाईक यांचे पत्र हा त्यांचा अंतर्गत प्रश्न

‘शिवसेनेनी भाजपसोबत यावं अशी अनेकांची इच्छा असू शकते; मात्र यावर आमचं स्पष्ट मत आहे, की हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. हे पत्र सरनाईक यांनी त्यांच्या प्रमुखांना लिहिलं आहे. त्यावर काय उत्तर द्यायचं ते बघतील.

आम्ही आता सक्षम विरोधी पक्ष म्हणून राज्यातील जनतेचे प्रश्न मांडत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे, की मागील निवडणुकीत आम्ही युतीत निवडणूक लढल्याने बहुमतापर्यंत पोहोचलो नव्हतो; मात्र आगामी काळात आम्ही बहुमतासह सत्तेत येऊ,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘वेट अँड वाॅच’ ची भूमिका गुलदस्त्यात

शिवसेनेकडून जुळवून घेण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजप वेट अँड वॉच या भूमिकेत असेल असं बोललं जात होतं.

मात्र देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावरच भाजप बहुमताने सत्तेत येईल, असं म्हटल्याने शिवसेनेसोबत युती करण्यास भाजप अनुकूल नाही की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.