माजी गृहराज्यमंत्री आणि मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या भाजप प्रवेशाला पक्षातील नेत्यांचा विरोध होता. त्यांचा विरोध डावलून सिंह यांना भाजपत प्रवेश दिल्यानं पक्षाच्या नेत्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.
दिल्लीच्या आदेशाने पक्षप्रवेश
सिंह यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यासाठी थेट दिल्लीतून आदेश आल्याची चर्चा आहे; मात्र कृपाशंकर सिंह यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमधून भाजपत येऊन स्थिरस्थावर झालेल्या उत्तर भारतीय नेत्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.
आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सिंह यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याची चर्चा आहे. राज्यातील नेते त्यांना भाजपमध्ये घेण्यास फारसे इच्छुक नव्हते, असे संकेत मिळत आहेत.
उत्तर भारतीयांचा कल भाजपकडेच
मुंबईत 25 ते 26 लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. पूर्वी ब्राम्हण, ठाकूर आणि बनिया हे भाजपचे मतदार होते, तर ओबीसी, दलित उत्तर भारतीय हे काँग्रेसचे मतदार होते; मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून एकगठ्ठा उत्तर भारतीय मतदार भाजपकडे वळला आहे. त्याचाच फायदा भाजपला 2017 च्या पालिका निवडणुकीतही झाला.
त्याचबरोबर आताही उत्तर भारतीय मतदारांचा कल फारसा बदललेला नसल्याने तसेच उत्तर भारतातील तिन्ही प्रमुख राज्यात भाजपचे सरकार असल्याने त्यांचाही फायदा मुंबईत होणार हे निश्चित आहे.
सिंह यांच्यामुळे स्थान धोक्यात येण्याची भीती
मुंबईत नव्या उत्तर भारतीय चेहऱ्याची गरज नसल्याचे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचे म्हणणे होते; मात्र कृपाशंकर सिंह यांनी थेट दिल्लीतून हा प्रवेश करून घेतला असल्याचे समजते.
महानगर पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते माजी आमदार राजहंस सिंह, माजी आमदार रमेश सिंह ठाकूर यांनी यापूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
ते नव्या पक्षात स्थिरावलेही आहेत; मात्र आता कृपाशंकर सिंह यांच्या प्रवेशाने त्यांची धाकधूकही वाढली असणारच. कृपाशंकर सिंह हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते.
तसेच फेरीवाले आणि उत्तर भारतीय कष्टकऱ्यांची मोट त्यांनी चांगली बांधलेली आहे. त्यामुळे कृपाशंकर सिंह भाजपमध्ये आव्हान निर्माण करू शकतील, अशी भीती या स्थिरावलेल्या माजी आमदारांना वाटत आहे.
सत्ताधा-यांच्या हाती आयते कोलित
कृपाशंकर सिंह यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीचे तसेच विविध आर्थिक प्रकरणे प्रलंबीत आहेत. त्यामुळे राज्यातील नेतृत्व कृपाशंकर सिंह यांना पक्षात घेण्यासाठी फारसे इच्छुक नव्हते.
कृपाशंकर सिंह यांना पक्षात घेतल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीच्या प्रचारात मुद्दा मिळू शकतो अशी भीती आहे.