भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. मोबाइलवरून शिवीगाळीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

यानंतर भाजपवर चौफेर टीका होऊ लागली आहे. तथापि, ही ऑडिओ क्लिप खोटी व बनावट असून, त्यातील आवाज आपला नसल्याचा दावा आमदार कांबळे यांनी केला आहे. संबंधित महिला अधिकारी महापालिकेच्या ड्रेनेज विभागात वरिष्ठ पदावर आहेत.

एका कामासंदर्भात कांबळे यांनी कार्यकर्त्याच्या मोबाइलवरून त्यांच्याशी संपर्क साधला. बिलं काढता की नाही, काय करता ते सांगा? नाहीतर तुमच्याकडे बघून घेतो, असे म्हणत धमकावले व शिवीगाळ केली.

Advertisement

या वेळी संबंधित महिलेने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेता त्यांची परवानगी घ्यावी लागेल, असे सांगितले. त्यावर चिडलेल्या कांबळे यांनी अगदीच खालच्या स्तरावर जाऊन शिवीगाळ केली. हे सहन न झाल्याने महिलेने फोन कार्यकर्त्याच्या हातात दिला.

त्यावर कांबळे यांनी कार्यकर्त्याला फोन स्पीकरवर टाकायला सांगून पुन्हा शिवीगाळ केली. तसेच काही पुरुष अधिकाऱ्यांनाही शिवीगाळ करीत धमकावले. या संभाषणाचे रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे.

Advertisement