जळगावमध्ये भाजपला धक्क्यामागून धक्के बसत आहेत. अगोदर २९ नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. तिथली भाजपची सत्ता उलथवून टाकली आणि आता याच बंडखोरांनी भाजपच्या गटनेते, उपनेत्यांची हकालपट्टी केली.

नवीन पदाधिकारी नियुक्त

भारतीय जनता पक्षातील फुटलेल्या 29 नगरसेवकांनी बैठक घेऊन भाजपचे गटनेते, उपगटनेते यांची हकालपट्टी केली आणि नवीन पदाधिकारी नियुक्त केले.

जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वीच भाजपच्या निम्म्या नगरसेवकांचा गट फुटून शिवसेनेत गेला होता.

Advertisement

जळगाव महापालिकेत काही महिन्यांपूर्वी भाजपच्या 29 नगरसेवकांनी फुटून शिवसेनेला पाठिंबा दिला, त्यामुळे शिवसेनेचा महापौर विराजमान झाला.

महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता जाऊन शिवसेनेची सत्ता आली. यानंतर कालच्या दिवशी नाट्यमय कलाटणी मिळाली.

फुटीर भाजप नगरसेवकांनी स्वतंत्र बैठक घेऊन महापालिकेत नवीन पदाधिकारी नियुक्त केले आहेत.

Advertisement

याबाबत या गटाचे सभागृह नेते ललित कोल्हे यांनी महापौरांना लेखी पत्र देऊन नवीन पदाधिकारी नियुक्तीला मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

हे आहेत नवीन पदाधिकारी ?

याबाबत दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, भाजपचे गटनेते असलेले भगत बालानी यांना बदलून त्यांच्या रिक्त जागेवर दिलीप बबनराव पोकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपगट नेते राजेंद्र झिपरु पाटील यांच्या जागी चेतन गणेश सनकत यांची निवड करण्यात आली आहे.

लोकशाही पद्धतीने ठराव करून या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे. या बैठकीचे रितसर इतिवृत्त तयार करण्यात आले असल्याचे ललित कोल्हे यांनी म्हटले आहे. प्रोसेडिंग बुकची प्रत त्यांनी दिली असून यात 29 नगरसेवकांच्या सह्या आहेत.

Advertisement

भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर

जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला होता.

या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला.

Advertisement