Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक भाजप लढविणारःविखे

राज्यातील आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला घाबरत आहे. त्यांचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही, असं सांगतानाच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्याबाबत भाजप निर्णय घेईल, असं आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केलं.

सरकार लवकरच कोसळेल

पुण्यात मीडियाशी संवाद साधताना राज्यातील आघाडी सरकार जास्त दिवस चालणार नाही, असं भाकीत केलं. हे सरकार आपल्याच ओझ्याने पडणार असून फक्त वेळेचा प्रश्न आहे, असं ते म्हणाले.

पुनर्विचार याचिका दाखल करणार

या वेळी त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणाबाबत हे सरकार गंभीर नाही.

हे सरकार काही करेल असं वाटत नाही. त्यामुळे आता मीच सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. त्याची तयारीही सुरू केली आहे, असं त्यांनी सांगितलं.

सरकारच्या अनास्थेमुळे मराठा समाजाचं आरक्षण गेलं. ओबीसी आरक्षणाचंही तेच झालं. त्यामुळे सरकार विरोधात वातावरण आहे. सरकारला हेच करायचं होतं का?, असा संतप्त सवालही त्यांनी केला.

ती तर फॅशन झाली

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर सरकारने प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे होते. त्यांनी याबाबत श्वेतपत्रिका काढायला हवी होती; मात्र ते न करता सर्व काही केंद्र सरकारवर ढकलत आहे.

काहीही झालं की केंद्र सरकारवर ढकलायचं ही आता फॅशन झाली आहे. त्यामुळेच मी स्वत: पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले.

मराठा-ओबीसी विद्यार्थ्यांची फी भरणार

सारथीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा द्या, मराठा-ओबीसी विद्यार्थ्यांची शंभर टक्के फी सरकारने भरावी, इतर शिक्षण संस्थाचालकांनीही त्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असं सांगतानाच माझ्या मतदारसंघातील जे विद्यार्थी प्रवरा शिक्षण संस्थेत प्रवेश घेतील, त्या मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांची फी मी स्वत: भरणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

तसेच ज्या नेत्यांच्या शिक्षण संस्था आहेत, त्यांनी अशा प्रकारचा शिक्षणाचा भार उचलावा, असं आवाहनही त्यांनी केलं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध नोंदवला.

Leave a comment