Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

२३ गावांवरून भाजप सरकारविरोधात न्यायालयीन लढा देणार

महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकास आराखड्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गावांचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे घोषित केल्यानंतरही महापालिकेतील भाजपने आक्रमक भूमिका घेऊन सरकारविरोधात न्यायालयीन लढा देण्याचा इरादा जाहीर केला.

महापालिकाच करणार विकास

राज्य सरकारने महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ला विशेष नियोजन प्राधिकरणाच्या दिलेल्या दर्जाविरोधात महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Advertisement

महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत या २३ गावांचा विकास आराखडा हा महापालिकेनेच करण्याचा ‘इरादा’ जाहीर करून राज्य सरकारविरोधातील न्यायालयीन लढाईचे पहिले पाऊल उचलले आहे.

खास सभेतील हवाच काढली

स्थायी समितीच्या आठ सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार ‘इरादा’ जाहीर करण्यासाठीच्या या खास सभेचे आयोजन करण्यात आले होते; मात्र राज्य सरकारने अचानक स्वतंत्र आदेश देऊन हा आराखडा ‘पीएमआरडीए’ करणार असल्याचे स्पष्ट केल्याने महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या या खास सभेतील हवा निघाली.

या विशेष सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले, तर सत्ताधारी भाजपने बहुमताच्या आधारावर विकास आराखडा करण्याचा ‘इरादा’ मंजूर करून राज्य सरकारविरोधातील न्यायालयीन लढाईचे पहिले पाऊल उचलले आहे.

Advertisement

उट्टे काढण्यात धन्यता

सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीपासूनच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार टीका करत होते.

जवळपास चार तास चाललेल्या या सभेत एकमेकांचे उट्टे काढण्याची संधी सत्ताधारी; तसेच विरोधक यापैकी कोणीही सोडली नाही.

सभेच्या सुरुवातीलाच विरोधकांकडून या सभेबाबत महापालिका आयुक्तांनी खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

Advertisement

मात्र, सत्ताधारी भाजपने विरोधकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करून भाषणे संपल्यानंतर आयुक्तांकडून खुलासा करण्यात येईल, अशी भूमिका घेऊन सभेचे कामकाज सुरूच ठेवले.

 

Advertisement
Leave a comment