एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यालयात दुस-या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहसा जात नाही. पक्षप्रवेश करण्यासाठी तरी जातात. फार तर मित्रपक्षाचे कार्यकर्ते जातात; परंतु विरोधी पक्षाचे कार्यकर्ते जातात, तेव्हा तो चर्चेचा विषय होतो.

बापट, मोहोळ राष्ट्रवादी भवनात

शहरासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस भवनला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ खासदार गिरीश बापट यांच्यासह अन्य भाजपच्या पुढाऱ्यांनी भेट दिली. नव्या कार्यालयातून पक्षाचं काम कसं चालतं, याची माहिती भाजप नेत्यांनी घेतली.

‘भाजप नेत्यांची राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट…’, ही चर्चा पुण्याच्या चौकाचौकात ऐकायला मिळत होती; पण पुणेकरांना याचं काहीही नवल वाटत नव्हतं. कारण पुण्याची हीच तर संस्कृती आहे…

Advertisement

हे नेते होते उपस्थित

मोहोळ, बापट, भाजप पुणे शहराध्यक्ष आमदार जगदीश मुळीक, भाजप ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, भाजप शहर सरचिटणीस गणेश घोष, दत्ताभाऊ खाडे, दीपक नागपुरे, सुशील मेंगडे, अजय खेडेकर यांच्यासह पक्ष पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली.

या सगळ्यांचं स्वागत राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे तसंच पुणे शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमदार प्रशांत जगताप यांनी केलं.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला पाहुणचार

राजकीय भेदाभेद विसरून प्रेम सलोखा जपणे हीच पुण्याची संस्कृती आहे. याच भावनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयाला भेट दिली.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन कार्यालय छत्रपती शाहू सेतूजवळ (डेंगळे पूल) येथे सुरू करण्यात आले आहे.

यानिमित्ताने चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या, असं मुळीक यांनी सांगितलं.

तसंच राष्ट्रवादीने पुणे शहराच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी पुणे शहर भाजपला सहकार्य करावे, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Advertisement