Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

नव्या मुंबईतही कोरोनाचे बोगस लसीकरण

नवी मुंबई : उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करताना यापुढे बोगस लसीकरण होणार नाही, अशी व्यवस्था करण्याचे मान्य केल्यानंतरही बोगस लसीकरणाचे प्रकार थांबायला तयार नाही. नव्या मुंबईतही बोगस लसीकरणाचे प्रकार पुढे आले आहेत.

डाॅक्टरांसह तिघांविरुद्ध गुन्हा

कांदिवली पाठोपाठ नवी मुंबईतदेखील बोगस कोरोना लसीकरणाचा प्रकार समोर आला आहे. या बोगस लसीकरणाचा मास्टरमाईंडचं नाव डॉ. मनीष त्रिपाठी असं आहे. त्याच्यासह आणखी दोन जणांवर नवी मुंबई तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नवी मुंबईतील शिरवणे एमआयडीसी येथील कंपनीत लसीकरण दरम्यान कामगारांना बनावट लस देण्यात आल्याचे उघड झाले आहे. बनावट लसीकरण करून संबंधितांनी कंपनीकडून चार लाख 24 हजार 536 रुपये उकळले होते.

३५० नागरिकांची फसवणूक

याबाबत नवी मुंबई नेरुळ येथे राहणाऱ्या फिर्यादी कल्पेश पद्माकर पाटील यांनी तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाटील काम करत असलेल्या अटोम्बर्ग टेक्नॉलॉजी कंपनीत लसीकरणाचे आयोजन करण्यात आले.

या वेळी केइसीपी हेल्थ केअर रुग्णालयाचे डॉ. मनीष त्रिपाठी, करीम आणि आणखी एक व्यक्ती यांनी संगनमताने प्रशिक्षित डॉक्टर आणि कर्मचारी यांची नेमणूक न करता खोटे लसीकरण केले.

तसेच लसीकरणाचे 4 लाख 24 हजार 536 रुपये घेतले. डॉक्टर प्रशिक्षित असल्याचे भासवून नानावटी रुग्णलयात वेगळ्या तारखांना ऑनलाईन माहिती भरून दोन जणांना प्रमाणत्र देत ते खरे असल्याचे भासवले. उर्वरित 350 लोकांना प्रमाणपत्र न देऊन फसवणूक केली आहे.

लसीकरण केल्याचे बनावट प्रमाणपत्र वाटप

शिरवणे एमआयडीसीमधील अटोम्बर्ग टेक्नॉलॉजी या कंपनीत हे बनावट लसीकरण झाले. कंपनीतर्फे कामगारांसाठी लसीकरण भरवण्यात आले होते. या लसीकरणाची जबाबदारी केईसीपी हेल्थ केयर हॉस्पिटलवर सोपवण्यात आली होती.

त्यानुसार डॉ. मनीष त्रिपाठी यांनी त्यांचे पथक त्याठिकाणी पाठवले होते. 23 एप्रिलला हे शिबीर भरवले होते. त्या वेळी कंपनीतल्या 352 कामगारांचे लसीकरण करून 4 लाख 24 हजार रुपये उकळण्यात आले.

याशिवाय लसीकरण केल्याचे त्यांना बनावट प्रमाणपत्र देखील देण्यात आले. मात्र काही कामगार दुसरा डोस घेण्यासाठी गेले असता, त्यांना पहिल्या डोस घेतल्याचे देण्यात आलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले.

डॉक्टरवर कारवाई

कंपनीतर्फे पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्याआधारे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र आव्हाड, उपनिरीक्षक रमेश चव्हाण यांच्यामार्फत तपास सुरू होता. यामध्ये कंपनीच्या 352 कामगारांना बनावट लस देण्यात आल्याचे समोर आले.

कांदिवली, नवी मुंबईसह इतर कोणकोणत्या ठिकाणी असे बोगस लसीकरण झाले आहे. याबाबत डॉ. त्रिपाठी याला अटक झाल्याने त्याच्याकडे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a comment