Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

काळ्या बुरशीनंतर आता बोन डेथचे संकट

कोरोनातून बरे झालेल्यांना आता काळ्या बुरशीने गाठले आहे. त्यातून आणखी एक गंभीर आजार समोर आला आहे. काळ्या बुरशीसोबतच आता बोन डेथचे संकट आले असून, त्यामुळे चिंता वाढली आहे.

 

मुंबईत बोन डेथचे तीन रुग्ण

जगभरात कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. याच्या नवनव्या व्हेरिएंटमुळे लोकांच्या संकटात वाढच होत आहे. त्यातच कोरोनामुक्त झाल्यानंतर होणाऱ्या आजारांमुळे लोकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. म्युकरमायकोसिससोबत आणखी एका आजाराने एन्ट्री केली आहे. मुंबईत म्युकरमायकोसिसनंतर मुंबईत बोन डेथ या आजाराचं नवीन संकट उभं राहिलं आहे. कोरोनातून बरं होणाऱ्या या आजाराचा सामना करावा लागत आहे. मुंबईमध्ये बोन डेथचे तीन रुग्ण आढळले आहेत. बोन डेथला अॅव्हैस्कुलर नेक्रोसिस असेही म्हटलं जाते.

रुग्णवाढीचा धोका

मुंबईच्या माहीम येथील हिंदुजा रुग्णालयात बोन डेथच्या तीन रुग्णावर उपचार करण्यात आले आहेत. या सर्वांचं वय 40 पेक्षा कमी आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर दोन महिन्यांत बोन डेथ हा आजार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. बोन डेथ या आजारांमध्ये हाडं निकामी होतात. शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. ही प्रामुख्यानं या आजाराची लक्षणं आहेत. डॉक्टरांच्या मते, भविष्यात बोन डेथ या आजाराचे रुग्ण वाढू शकतात.

स्टेराईडस्‌ वापरामुळे परिणाम

हिंदुजा रुग्णालयाचे संचालक डॉ. संजय अग्रवाल म्हणाले, की रुग्णांना मांडीच्या हाडाला प्रंचड वेदना झाल्या. बोन डेथ झालेले तिन्ही रुग्ण पेशानं डॉक्टर आहेत. लक्षणं दिसताच या रुग्णांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतल्यामुळे उपचार लगेच झाला. दरम्यान, म्युकरमायकोसिस आणि बोन डेथ या आजारांमध्ये स्टेरॉईडस्‌ प्रमुख कारण आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी स्टेराईडस्‌ सर्रास वापर केला जात आहे. याचाच फटका बसत असल्याचं बोललं जात आहे.

Leave a comment