ज्याच्या हाती कायम रिव्हाॅल्व्हर असायची, ज्याचा धाक असायचा, ज्याची दहशत असायची, त्या कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याच्या हाती आता पुस्तके आली आहेत. तो शिक्षणाचे धडे गिरवतो आहे. तो लवकरच पदवीचं शिक्षण पूर्ण करणार आहे.

कारागृहातून शिक्षण

अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहातून शिक्षण घेत आहे. त्याने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून बीए अभ्यासक्रमाची निवड केली आहे.

गवळी सध्या बीएच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. गवळी सध्या मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

Advertisement

पदवी प्रमाणपत्र दगडी चाळीच्या भिंतीवर

अरुण गवळीने बीए अभ्यासक्रम उत्तीर्ण केल्यानंतर त्याचं पदवीचं प्रमाणपत्र दगडी चाळीच्या भिंतीवर लावलं जाणार असल्याची माहिती त्याच्या समर्थकांनी दिली.

दगडी चाळीतील अरुण गवळीच्या निकटवर्तीयांनी पदवी अभ्यासक्रमाच्या माहितीला दुजोरा दिला.

काय आहे जामसांडेकर हत्या प्रकरण ?

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचा सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. त्यानंतर सदाशिव सुर्वेने अरुण गवळीच्या गँगमधील दोघांना जामसांडेकर यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचा आरोप आहे.

Advertisement

दोघांनी सदाशिवची अरुण गवळीशी भेट घालून दिली. गवळीने हत्या करण्यासाठी 30 लाखांची रक्कम मागितली. सदाशिवने 30 लाखांची रक्कम देण्याची तयारी दर्शवली.

अरुण गवळीने आपल्यावर संशय येऊ नये, म्हणून प्रताप गोडसेला जामसंडेकरांच्या हत्येसाठी नवे शूटर शोधण्यास सांगितलं.

गोडसेने नवे शूटर शोधण्याचे काम श्रीकृष्ण गुरव या साथीदाराकडे दिलं. श्रीकृष्णने नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली.

Advertisement

तसेच त्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे कबूल केले. यापैकी प्रत्येकी 20 हजार रुपयांचा अॅडव्हान्सही देण्यात आला होता.