जगभरात कोरोनाच्या नव्या प्रकाराने धुमाकूळ घातला असताना त्याला रोखण्यास सध्याच्या लसी उपयुक्त ठरतील का, ही शंका शास्त्रज्ञांनी सोडविली आहे.

‘बीटा’ आणि ‘डेल्टा’ या नव्या व्हेरियंटपासून संरक्षण देण्यात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशी परिणामकारक ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शोधनिबंध प्रकाशित

‘एनआयव्ही’तील शास्त्रज्ञ डॉ. प्रज्ञा यादव, डॉ. गजानन सकपाळ यांच्या संशोधनातून ही बाब समोर आली असून, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) याबाबतचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्धीसाठी पाठविला आहे.

Advertisement

‘जगभरात अल्फा (बी.१.१.७), बीटा (बी.१.३५१), गॅमा (बी.१.१.२८१) आणि डेल्टा (बी.१.६१७.२) असे कोरोनाचे विविध प्रकार घातक ठरत आहेत. यामुळे कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण अधिक वाढल्याचे निरीक्षण आहे.

मानवाच्या रोग प्रतिकारशक्तीवर विषाणू आक्रमण करीत आहेत,’ असे ‘एनआयव्ही’चे शास्त्रज्ञ डॉ. गजानन सकपाळ यांनी सांगितले. ‘भारतात दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढण्यास ‘डेल्टा व्हेरियंट’ कारणीभूत ठरला आहे.

निष्क्रिय विषाणूचा वापर करून तयार केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ कोरोना प्रतिबंधक लस यापूर्वी बी १, अल्फा, कप्पा यांसारख्या विषाणूंच्या संसर्गानंतरही उपयुक्त ठरत असल्याचे आढळले होते.

Advertisement

त्यामुळे नव्या विषाणूच्या प्रकारावर लसींचे संशोधन केले,’ अशी माहिती ‘एनआयव्ही’च्या शास्त्रज्ञ डॉ. यादव यांनी दिली.

महत्वाचे निष्कर्ष

देशात कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी दोन लसी उपलब्ध आहेत; मात्र लसी आल्यानंतर कोरोना विषाणूचे म्यूटंट, डबल म्युटंटसारखे प्रकार समोर येत आहेत.

त्यामुळे ‘बीटा’, ‘डेल्टा’ या प्रकरांवर ‘कोव्हॅक्सिन’ आणि ‘कोव्हिशिल्ड’ या लसींची परिणामकारकता कितपत असेल आणि या लसी विषाणूच्या बदलत्या स्वरूपामध्ये संरक्षण देऊ शकतील का, याबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती.

Advertisement

त्या पार्श्वभूमीवर ‘एनआयव्ही’च्या संशोधनातून महत्वाचे निष्कर्ष बाहेर आले आहेत. त्यामुळे या संशोधनाला महत्व प्राप्त झाले आहे.

संशोधनात काय…?

कोरोनामुक्त झालेले रुग्ण; तसेच दोन्ही लसींपैकी एका लसीचे दोन डोस घेतलेल्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यांचे डेल्टा, बीटा या विषाणूंशी ‘न्यूट्रलायझेशन’ची चाचणी प्रक्रिया करण्यात आली.

त्यातून दोन्ही लसी या नव्या प्रकारच्या विषाणूंवर प्रभावी ठरत असल्याचे सिद्ध झाले. कोव्हिशिल्ड; तसेच कोव्हॅक्सिन लसीबाबतचे संशोधन स्वतंत्र करण्यात आले.

Advertisement

त्या वेळी ‘कोव्हॅक्सिन’ किंवा ‘कोव्हिशिल्ड’ लस घेतलेल्या व्यक्तींना ‘डेल्टा’ तसेच ‘बीटा’ विषाणूच्या संसर्गाची तीव्रता फारशी होऊ शकली नाही. तसेच, त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज निर्माण झाली नाही.

दोन्ही विषाणूंच्या संसर्गानंतर लसीपासून संरक्षण मिळू शकेल,’ अशी माहिती ‘एनआयव्ही’च्या शास्त्रज्ञांनी दिली.

 

Advertisement