पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा (bharat jodo yatra) नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होत आहे. यासाठी राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. काँग्रेसने यासाठी जय्यत तयारी केली आहे. मात्र, त्यापूर्वी तेलंगणामध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील एका नेत्यासोबत दुर्दैवी प्रसंग घडला.

राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) हैदराबादमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. नितीन राऊत हे यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत चालत होते. राहुल गांधी यांना पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.

या गर्दीवर नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना बरेच कष्ट करावे लागत होते. पोलीस लोकांना राहुल गांधी यांच्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करत होते.

यावेळी तेलंगणातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने नितीन राऊत यांना जोरात ढकलले. या सगळ्या गदारोळात नितीन राऊत यांच्या डोळ्याला जबर मार बसला आहे.

त्यांच्या उजव्या डोळ्याला जबर मार लागला असून डोळ्याच्या भुवईचा भाग कापला गेला आहे. त्यामुळे त्यांचा डोळा अक्षरश: काळानिळा पडला होता. त्यांच्या हातापायालाही खरचटले आहे.

या नंतर नितीन राऊत यांना उपचारासाठी हैदराबादच्या बासेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची तब्येत ठीक असून, डॉक्तरांनी त्यांना काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत पुण्यातील (Pune) 1 हजार 150 पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात संबंधित पदाधिकारी हे सहभागी होणार आहेत.

यावेळी राज्यात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.