मुंबई – प्रत्येक नेत्याला मातोश्रीवर येण्यासाठी भाग पाडणारा बाळासाहेबांचा आदरयुक्त दबदबा उद्धव ठाकरेंनी रसातळाला पोहोचवला आहे. पक्ष, संघटना किंवा कार्यकर्त्यांसाठी कधीही घराबाहेर न पडलेले उद्धव ठाकरे (uddhav thackeray ) आता राहुल गांधींच्या (rahul gandhi ) पदयात्रेसाठी पायघड्या घालण्यासाठी घराबाहेर पडणार हा उद्धव ठाकरे यांच्यावर काळाने उगवलेला सूड आहे, अशी खोचक टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी बुधवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उपाध्ये (keshav upadhye) म्हणाले की, या आधी भाजपसोबत युती असताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे कधी रस्त्यावर उतरले नाहीत. लालकृष्ण अडवाणी-मुरली मनोहर जोशींच्या रथयात्रांत तर उद्धव ठाकरे फिरकले देखील नाहीत.

हात उंचावून जाहीर सभांमध्ये हिंदुत्वाच्या पोकळ गर्जना करणारे उद्धव ठाकरे बाबरी प्रकरणाच्या वेळी शिवसैनिकांना रस्त्यावर उतरवून घरात टीव्ही बघत होते, तर तीन वर्षांपूर्वीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी झाले नव्हते.

‘मुंह मे राम, बगल मे राहुल’ ही म्हण उद्धव ठाकरे यांच्यासाठीच शब्दशः तयार झाली असावी असा टोला हाणून ते म्हणाले, यांना रामाची नाही, तर राहुलची आरती आवडू लागली आहे.

राहुल गांधींच्या (rahul gandhi ) पदयात्रेस हजर राहुन उद्धव ठाकरे आपल्या काँग्रेसनिष्ठेचा नजराणा सोनिया गांधींना देणार आहेत का, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

शिवसेनेचा भगवा रंग आता लाल झाला….

“हिंदुत्व हीच ताकद असलेल्या शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर करण्याचा व्यापक कट हिंदुत्वविरोधी राजकीय नेत्यांनी आखला आहे. कम्युनिस्टांनी दिलेला पाठिंबा हा त्या कटाचाच एक भाग असून आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना या कटात पुरती फसली आहे. शिवसेनेचा भगवा रंग आता लाल झाला आहे. असं देखील ते काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.