पुणे – राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. जामिनावर बाहेर आल्यानंतर आता पुन्हा एकदा आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे आव्हाड यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. मागील 72 तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी तडकाफडकी हा निर्णय घेतल्याचं दिसून आलं आहे.

आव्हाड यांच्यावर एका महिलेने गैरवर्तन केल्याचा (Molestation) आरोप केला आहे. ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये एका महिलेला ढकलल्याचा जितेंद्र आव्हाडांचा (Jitendra Awhad) व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून, ते सध्या अडचणीत सापडले आहेत.

या प्रकरणी आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, त्यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्यांच्या निर्णयावर आता पत्नी ऋता आव्हाड (Ruta Awhad) यांनी ट्वीटरवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी समर्थकांनी केला.

ऋता आव्हाड (Ruta Awhad) आपल्या ट्विट मध्ये म्हणतात…

“ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रिदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत,” असं ऋता (Ruta Awhad) यांनी म्हटलं आहे.

तसेच अन्य एका ट्वीटमध्ये, “राष्ट्रवादी व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या प्रकरणी हे गुन्हे रिदाविरोधात दाखल आहेत,” असंही ऋता यांनी सांगितलं.

“अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेनमध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील,” असंही ऋता (Ruta Awhad) यांनी म्हटलं आहे.

“रिदा रशिद या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात.आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती स्पॉनटेनियस रिअॅक्शन होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही,” असं ऋता यांनी म्हटलं आहे.