Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

महिलेच्या मूत्रपिंडातून काढल्या कर्करोगाच्या गाठी

महिलेच्या दोन्ही मूत्रपिंडातून पावणेतीन किलो आणि अडीचशे ग्रॅमच्या गाठी काढण्यात आल्या. या शस्त्रक्रिया पुण्यातील एस रुग्णालयात यशस्वीपणे करण्यात आल्या.

या डाॅक्टरांचे योगदान

एस रुग्णालयाचे ज्येष्ठ मूत्रपिंडतज्ज्ञ प्रा. डॉ. सुरेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. सूपर्ण खळदकर आणि डॉ. गुरुराज पडसलगी यांनी ही अवघड शस्त्रक्रिया केली.

ही महिला गेल्या आठ वर्षांपासून दोन्ही मूत्रपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त होती. यापूर्वी त्यांनी अनेक डॉक्टरांची भेट घेऊन सल्ला घेतला होता. डॉक्टरांनी एका पाठोपाठ एक अशा काही कालावधीनंतर मूत्रपिंडावरील शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. रुग्णाला कायमचे नियमित डायलिसिस करावे लागेल असे सांगितले होते.

डायलिसीसची आवश्यकता नाही

नाशिकमधील या ५६ वर्षीय महिलेच्या दोन्ही मूत्रपिंडांमध्ये कर्करोगाचे निदान झाले. त्यानंतर दोन्ही मूत्रपिंड काढण्याचा व कायमचे डायलिसिस करण्याचा सल्ला दिला होता. यासाठी त्यांची तयारी नव्हती. त्यांनी आशाही सोडली होती.

जेव्हा त्या एस रुग्णालयात आल्या, तेव्हा त्यांची प्रकृती खालावली होती. शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या शिल्लक राहिलेल्या मूत्रपिंडाच्या काही भागाचे कार्य पुन्हा पूर्ववत झाले आहे. यामुळे डायलिसिसची आवश्यकता कायम भासणार नाही, असे डाॅ पाटणकर यांनी सांगितले.

जोखीम पत्करली

कर्करोगाची गाठ तिसऱ्या टप्प्यातील होती. संपूर्ण डाव्या आणि उजवीकडील मूत्रपिंडाच्या अर्ध्याहून अधिक भागात ती गाठ होती. अनेकदा एकाच वेळेस दोन्ही मूत्रपिंडांमध्ये कर्करोगाचा ट्यूमर असण्याची शक्यता खूपच कमी असते. एकूण मूत्रपिंड कर्करोगांपैकी याचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी असते.

या रुग्णाचा चाचणी अहवाल पाहिल्यानंतर संपूर्ण डावे मूत्रपिंड कर्करोगाने बाधित झाले होते. त्यामुळे ‘रॅडिकल नेफ्रोक्टॉमी’ ही प्रक्रिया करण्याची आवश्यकता होती. तर उजव्या बाजूतील मूत्रपिंडाचा ६० टक्क्यांपेक्षा जास्त भाग कर्करोगग्रस्त होता, तरीही गाठ काढताना जोखीम होती,’ असे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.

Leave a comment