पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वप्नवत योजना म्हणून जिचा उल्लेख केला जात होता, ती योजना आता गुंडाळण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप माजी आमदार मोहन जोशी यांनी केला.

योजनेला घरघर

मोदी यांनी गेल्या सहा वर्षांपूर्वी पुण्यात मोठ्या धूमधडाक्यात ही योजना सुरू केली. महापालिकेला स्वतंत्र अशी यंत्रणा उभी केली. मोदी यांच्याच हस्ते या योजनेतील कामाची उद्‌घाटने झाली; परंतु या योजनेला आता घरघर लागली आहे. तिच्यासाठी पुरेशी तरतूद होत नाही. नवी कामे घेतली जात नाहीत, असे त्यांनी सांगितले.

मुदतवाढीबाबत साशंकता

मोदी यांनी जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेत पुण्यासह देशभरातील शंभर शहरांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रात पुण्यासह दहा शहरे आहेत. या महिन्यात या योजनेची मुदत संपत आहे.

Advertisement

पुण्यासह सर्वच शहरे स्मार्ट सिटी योजनेला मुदतवाढ मिळेल, की नाही याबाबत साशंक आहे. नुकतीच देशभरातील ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात ‘स्मार्ट सिटी’च्या रखडलेल्या व नियोजित कामांना कोणत्याही प्रकारचा निधी दिला गेला नाही.

यावरून ही योजना लवकरच केंद्र सरकार गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचे दिसते आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे.

प्रकल्प मार्च २०२२ पर्यंत मार्गी लावण्याचे आदेश

‘स्मार्ट सिटी मिशन’चे सहसचिव कुणालकुमार यांनी राज्यातील सर्व सीईओंची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Advertisement

रखडलेले सर्व प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहे. मार्च २०२२ पर्यंत हाती असलेले सर्व प्रकल्प मार्गी लावावेत. यानंतर योजनेला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे.