शहरातील डेक्कन, कर्वेनगर, वारजे माळवाडी, धायरी, कोथरूड, सिंहगड रस्ता या परिसरासह पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यात देखील पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सांगली, पुणे, बीड, सोलापूर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच येत्या पाच दिवसांत राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या कोकण किनारपट्टीवर याआधीच पावसाला सुरुवात झाली आहे.

त्यानंतर येत्या पाच दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या चार- पाच दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल घडून आल्याने उकाडा अधिक वाढत होता.

Advertisement

वाढत्या उकाड्याचे पावसात रूपांतर होईल, असे अपेक्षित होते. अखेर शनिवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास आकाशात जमून आलेल्या काळेकुट्ट ढगांनी विजांच्या कडकडाटात बरसण्यास सुरुवात केली.

एक तासांहून अधिक वेळ झालेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. सद्य:स्थितीत शहरात लॉकडाऊन असल्याने रस्त्यांवर गर्दी नव्हती. मात्र, शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची खोदाई केली आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे प्रवाह बदलल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement