मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना पंतप्रधान करा, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं. त्यावरून राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
सोशल मीडियावरही उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांची हेटाळणीच
चंद्रकांत पाटील यांनी चव्हाण यांना टोला लगावला. पृथ्वीबाबांचं ते वक्तव्य स्तुतीपर होतं की? असा खोचक सवाल करतानाच असं विधान करून त्यांनी मुख्यमंत्र्यांची हेटाळणीच केली, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.
छगन भुजबळ यांनाच आव्हान
भाजपच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित पाटील यांनी थेट छगन भुजबळ यांना आव्हान दिलं.
भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे सरकारमधील दोन मंत्री लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत. ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपच्या मनात खोट नाही.
भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर कोल्हापूरच्या बिंदू चौकात येऊन फडणवीस यांच्याशी चर्चा करावी. म्हणजे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल, असं पाटील म्हणाले.
तो निर्णय घेणं सोपं नाही
ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं असलं तरी आम्ही या जागांवर ओबीसी उमेदवारच उभे करणार आहोत. तसं आमचं ठरलं आहे. ओपनच्या जागेवर ओपनवाला टपून बसला असतो.
ओबीसीला ती जागा सुटली म्हणून तो बोटं मोडत असतो, त्या ठिकाणी संधी आलीय ओबीसाला निवडणूक लढवण्याची. या ओबीसींच्या जागा आहेत आणि तिथे ओबीसीच उभा राहणार हा निर्णय करणं सोपं नाही, असं त्यांनी सांगितलं.
शिवसेनेसोबत राहिल्यानेच केस उडाले
पाच वर्षे सरकारमध्ये आपण होतो. माझ्याकडे आठ आठ खाती होती. माझे केस उडाले ते त्यांच्याबरोबर सरकार चालवण्यामुळे झाले आहे. रोज भांडणं. रोज भांडणं.
सकाळी उठलं की राऊत जाकीट बिकीट घालून रोज शिव्याशाप. अरे सरकारमध्ये आहात ना बाबा तुम्ही? रोज राजीनाम्याची धमकी. रोज बाहेर पडण्याची भाषा एवढंच कळतं की बाहेर पडायचं.
खोडा घालायचा. त्यामुळे आपल्याला आपल्या ताकदीवर सरकार आणायचं आहे. देवेंद्र फडणवीस सांगतील तसं आपण धावायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.