ग्रामपंचायतीने वारंवार आक्षेप घेऊनही येथील आयटीपार्कमधील काही कंपन्या रसायनमिश्रित पाणी सोडत आहेत. कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या या रसायनमिश्रित पाण्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.

बोडकेवाडीसह आजूबाजूच्या भागात पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेल्स व विहिरींमधील पाणी दूषित होत आहेत.

कंपन्यांवर कारवाईची मागणी

ग्रामपंचायतीकडून संबंधित कंपन्यांना अनेकदा पत्रव्यवहार करून ही बाब निदर्शनास आणून दिलेली असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.

Advertisement

नियमबाह्य पद्धतीने व इतरांना धोका निर्माण होईल, अशा प्रकारे रसायनमिश्रित पाणी बाहेर सोडणाऱ्या या बेजबाबदार कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रक्रिया न करताच सोडले जाते पाणी

फेज दोन हद्दीतील काही कंपन्यांकडून रसायनमिश्रित पाणी कसलीही प्रक्रिया न करता, बोडकेवाडी परिसरातील नाल्यात सोडण्यात येते. ते पाणी नाल्यावाटे जवळ असलेल्या दगडीखाणीत जाऊन साचते.

साठलेले पाणी जमिनीत मुरते तसेच परिसरातील शेतात मिसळते. काही दूषित पाणी जवळील नैसर्गिक ओढ्याने फेज दोन येथून परदेशी वस्ती, मुलाणी वस्ती, राक्षे वस्ती मार्गे नदीला जाऊन मिळते.

Advertisement

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करणार

“रसायनमिश्रित पाण्यामुळे शेतीचे नुकसान होऊन बोअरवेल्स आणि विहिरींचे पाणी दूषित होणे अतिशय गंभीर बाब आहे.

याबाबतीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी बोलून, सर्व तपशील घेऊन व खात्री करून यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल,” अशी माहिती मुळशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी दिली.

आंदोलनाच्या पवित्र्यात

आयटीपार्क हद्दीतून येणारे दूषित रसायनमिश्रित पाणी जमिनीत मुरत असल्याने बोडकेवाडीसह मुलाणी वस्ती, राक्षे वस्ती याठिकाणी असलेल्या बोअरवेल्स आणि विहिरींचे पाणीसुद्धा दूषित होत आहे.

Advertisement

ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामपंचायतीकडे याबाबतची तक्रार केली आहे. ग्रामपंचायत आणि पदाधिकाऱ्यांनाही या कंपन्या दाद देत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये याविषयी रोष वाढत आहे.

रसायनमिश्रित पाणी सोडण्याचे थांबविले नाही, तर बेजबाबदार कंपन्यांसमोर त्रस्त ग्रामस्थ धरणे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

 

Advertisement