मुंबई – शिंदेगटाच्या बंडानंतर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार सत्तेत आलंय. नवं सरकार सत्तेत आल्यानंतर काल पहिलं अधिवेशन (Monsoon Session) होतं. त्यामुळे विरोधक जोरदार हल्लाबोल करणार हे निश्चित होतं. पण विरोधकांच्या या निषेधात भर पडली ती क्रिएटिव्ह घोषणाबाजीची.., या घोषणाबाजीमुळे विरोधकांचा आवाज मोजक्या अन् ठोस शब्दात सरकारसह जनतेपर्यंत पोहोचला असल्याचं पाहायला मिळत आहे.

आज याच अधिवेशनाचा (Monsoon Session) दुसरा दिवस होता. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण पुन्हा एकदा पाहायला मिळालं.

तसेच, एकमेकांवर मिश्किल टिप्पणी देखील करताना हे राजकीय नेते दिसले. गुरुवारी अशाच एका चर्चेदरम्यान विरोधकांच्या टोलेबाजीमुळे सभागृहात चांगलाच हशा उडाला होता.

याच कारण म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्या भाषणातून थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) दाढीलाच हात घातला.

विधानसभेच्या कामकाजादरम्यान आज जीएसटीसंदर्भातलं विधेयक चर्चेला आल्यानंतर त्यावर बोलण्यासाठी छगन भुजबळ उभे राहिले. त्यांनी अनेक जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्यावरून केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र आक्षेप घेतला.

मात्र, जीएसटीसंदर्भातील आपला मुद्दा मांडण्यापूर्वी छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) समोरच्या बाकावर बसलेल्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून दाढीवर मिश्किल टिप्पणी केली.

यावेळी भुजबळ म्हणाले.., “समोर मुख्यमंत्री बसले आहेत. मला मुख्यमंत्र्यांकडे बघून खूप आनंद झाला आहे. पण तुम्ही मुख्यमंत्री झालात यासोबतच मला आनंद वेगळाच आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले.

पण त्यातही सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव फक्त महाराष्ट्रात आहे. सफेद दाढीचा प्रभाव दिल्लीपासून भारतभर आहे.” असं भुजबळ म्हणताच सभागृहात एकच हाशा पिकला.