मुख्यमंत्री ठाकरे यांचे निर्देश; इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी गोदावरी, गिरणा तसेच अन्य खो-यात वळविण्यासाठीचे महत्त्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबबावा.

हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आंतरराज्य स्तरावर काही अडचणी असतील, तर संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मी स्वतः चर्चा करून मार्ग काढीन, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांचा आढावा

जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पासंदर्भात वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत ठाकरे बोलत होते.

जलसंपदा विभागाने हाती घेतलेले पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविणे आणि वैनगंगा-नळगंगा प्रकल्पासारखे महत्वपूर्ण प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी विभागाने कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

ठाकरे म्हणाले, की वन विभागासंदर्भातील अडचणींबाबत योग्य सर्वेक्षण करावे. योजनांना अधिक गतिमान करण्याकडे विभागाने लक्ष द्यावे, जेणेकरुन प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन त्याचा लाभ होऊ शकेल. यातून राज्याचे सिंचन क्षेत्र वाढेल.

प्रकल्प ‘मिशन मोड’ वर : जयंत पाटील

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विभागामार्फत होत असलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

येत्या दोन वर्षांत महत्वपूर्ण 104 प्रकल्प पूर्ण करण्याचे विभागाचे नियोजन आहे, असं त्यांनी सांगितलं.

त्यांनी विभागाच्या नदीजोड, वळण योजना राबविण्याबाबत अतिरिक्त पाणी उपलब्ध असलेला प्रदेश आणि पाण्याची तूट असलेला प्रदेश यांची माहिती दिली.

पूर्व विदर्भ (वैनगंगा खोरे), नारपार-दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदी खोरे, पिंजाळ, उल्हास खोरे यात अतिरिक्त असलेले पाणी अनुक्रमे विदर्भातील अवर्षण प्रवण भाग, मराठवाडा व खानदेश, नाशिक तसेच मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे (घरगुती व औद्योगिक वापर) या पाण्याची तूट असलेल्या प्रदेशात देण्याबाबतची माहिती दिली.

पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, त्याठिकाणी पाणी मिळाल्यानंतर त्या भागात महत्वाचा बदल होईल. सिंचन क्षेत्र वाढेल, असेही पाटील यांनी सांगितले.

वळण बंधाऱ्यांना प्राधान्य द्यावे. हे प्रकल्प ‘मिशन मोड’ म्हणून हाती घेण्यात येत आहेत, असेही पाटील यांनी नमूद केलं.