शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता डेंगीचा आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या वर्षाच्या तुलनेत डेंगी नियंत्रणात असला, तरी पूर्व हवेलीतील उरुळी कांचनसह परिसरात चिकुनगुनिया व डेंगीचे (dengue) नवीन रुग्ण वाढत आहेत.

वातावरण आरोग्यासाठी अपायकारक

मागील पंधरा दिवसांत डेंगीचे विविध रुग्णालयात रुग्ण आढळून येत आहेत. अगोदरच कोरोनाचा समावेश झाला आहे. त्यातच कोरोनापाठोपाठ डेंगीचा चोर पावलाने शहरात प्रवेश असून बाधितांची संख्या आढळून येत आहे.

कोरोनाशी लढा देताना नागरिकांना डेंगीपासूनदेखील काळजी घ्यावी लागणार आहे. सध्याचे वातावरण हे आरोग्यासाठी अपायकारक आहे. त्यामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’च्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

वातावरणातील बदलामुळे व पावसामुळे साचून राहिलेल्या पाण्यामार्फत सर्वत्र मलेरिया, डेंगीच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे डेंगी व चिकनगुनियाच्या साथीत वाढ होताना दिसून येत आहे.

साथीच्या आजारांनी काढले डोके वर

कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना जुलै महिन्यातच डेंगी व चिकुणगुनिया या साथीच्या आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आव्हान आरोग्य व वैद्यकीय विभागापुढे आहे.

महामार्ग तसेच गॅरेजेसच्या ठिकाणी असलेले निकामी टायर्स, गरज नसलेले निकामी टायर्स, नारळाच्या करवंट्या, घराच्या छतावरील भंगार साहित्य, फुलदानी, फ्रिज, कुलर्सच्या ट्रेमध्ये स्वच्छता करण्यात यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.