Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

चिमुकल्याचा लागला लळा..त्यातून अपहरण..नंतर बेड्या

मुंबई : एखाद्याचा लळा लागणं वेगळं. त्याचा सांभाळ करणंही वेगळं; परंतु लळ्याचं रुपांतर आसक्तीत झालं, तर बेडया पडणं स्वाभावीक असतं.

असाच प्रकार मुंबईत घडला आणि चिमुकल्याला पळवून नेणा-या व्यक्तीला पारनेर तालुक्यातील जवळ्यात अटक करण्यात आली.

उद्देश चांगला; परंतु कृती चुकीची

फूटपाथवरील तीन वर्षांच्या मुलाचा लागलेला लळा आणि त्या मुलाच्या भविष्याची चिंता यामुळे एका मजुरानं त्याचं अपहरण केलं. मात्र त्याचा उद्देश चांगला असला, तरीही त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल होऊन अटक झाली आहे.

मुंबईतील घाटकोपरमध्ये ही घटना घडली. घाटकोपरच्या भटवाडी विभागात फूटपाथवर प्रिन्स शिंदे या अवघ्या दोन वर्षे आणि आठ महिन्यांच्या चिमुकल्याचं मेहबूब शेख या 52 वर्षीय व्यक्तीने 19 मे रोजीअपहरण केलं होतं.

प्रिन्स-मेहबूबचा वाढला जिव्हाळा

प्रिन्स शिंदे हा औरंगाबाद इथं राहणाऱ्या सानू यांच्या पहिल्या पतीपासून झालेला मुलगा आहे; मात्र सानूच्या आईने तिची मुंबईमधील मैत्रीण वैष्णवी खानला गेल्यावर्षी प्रिन्सचा सांभाळ करण्यास दिलं होतं.

वैष्णवी हीदेखील मजूर असून भटवाडीच्या फूटपाथवर राहते. तिच्याबरोबरच प्रिन्स राहू लागला. याच फूटपाथवर मेहबूबही राहत होता.

हळूहळू प्रिन्स हा मेहबूबसोबत जास्त वेळ राहू लागला. त्यांच्यातला जिव्हाळा एवढा वाढला, की मेहबूब सगळ्यांना तो आपला नातूच असल्याचं सांगत असे. त्याला जेवायला घालणं, आंघोळ घालणं, त्याची काळजी घेणं अशी सर्व कामं मेहबूब करू लागला होता.

प्रिन्सच्या भविष्याच्या चिंतेनं अपहरण

प्रिन्सचं आयुष्य असं फूटपाथवर जाऊ नये, त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं याची काळजी मेहबूबला होऊ लागली. यासाठी अखेर मेहबूबने वैष्णवीकडून त्याचं अपहरण करण्याचा निर्णय घेतला.

19 रोजी प्रिन्सला घेऊन मेहबूबने थेट पारनेर तालुक्यात असलेल्या जवळा गावातील आपल्या बहिणीचं घर गाठलं. इकडे वैष्णवीने दोन दिवस प्रिन्स आणि मेहबूबचा शोध घेतला; मात्र तो सापडला आला नाही. यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्यात प्रिन्सच्या अपहरणचा गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी पथक तयार करून मेहबूब आणि प्रिन्सचा शोध सुरू केला. प्रिन्स आणि मेहबूब जवळा गावात सापडले.

Leave a comment