दक्षिण चीनमधील ग्वांगझू प्रांतात कोरोना महामारीचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपायोजना अमलात आणत निर्बंध लागू केले आहेत.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. चीनच्या ग्वांगझू प्रांतात कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर लिवानसह अनेक जिल्ह्यांमध्ये चाचण्या सुरु केल्या आहेत.

हाँगकाँगमधील काही व्यापारिक भाग व ग्वांगझूमध्ये २० नवे रुग्ण आढळले आहेत. देशात रुग्णवाढ तीव्र गतीने होत असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. भारताच्या तुलनेत चीनमधील रुग्णवाढ ही अत्यल्प आहे. मात्र यामुळे चिनी अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.

सध्या देशभरात प्रचंड काळजी घेतली जात आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा सुद्धा केला जात आहे. तरीही प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून बाजारपेठा, बाल सुधारगृहे तथा मनोरंजन केंद्र बंद केली आहेत.