महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा होऊनही भूत, खेत, अंधश्रद्धांच्या आहारी लोक अजूनही जात आहेत. अंधश्रद्धांच्या नावाखाली फसवणूक, अघोरी कृत्ये होत आहेत. पिंपरीमध्ये असाच एक प्रकार घडला.

भूत आहे, असे सांगून अघोरी कृत्य

‘घरात भूत आहे, तुम्ही पौर्णिमेच्या आत मरून जाल,’ असे सांगून त्यावर उपाय करण्याच्या नावाखाली तिघांनी मिळून एका महिलेच्या जिभेला आणि ओठांना उदबत्तीने चटके दिले; तसेच पट्ट्याने मारहाण केली त्यानंतर महिलेकडून ३५ हजार रुपये घेतले आणि आणखी पैशांची मागणी केली.

चाकूचा धाक दाखवून पुन्हा एक हजार रुपये जबरदस्तीने घेतले. हा प्रकार १९ जून ते १ जुलै या कालावधीत दिघीतील चौधरी पार्क येथे घडला.

Advertisement

ही आहेत आरोपींची नावे

गौरव गणपत भोईर (वय १९, रा. नेवासे फाटा, नगर), अॅशली जोसेफ आणि तुषार (वय आणि पूर्ण नाव माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काय घडले ?

तक्रारदार महिलेला मागील एक वर्षापासून बरे वाटत नव्हते. त्यामुळे त्यांना बाहेरची करणी झाल्याचा संशय होता. ही बाब त्यांनी त्यांच्या बहिणीचा मुलगा गौरव याला सांगितली.

त्याने त्याच्या अन्य दोन मित्रांना तक्रारदार महिलेच्या घरी आणले. त्या दोघांनी पीडित महिलेला ‘तुमच्या घरात भूत आहे. तुम्ही पौर्णिमेच्या आत मरून जाणार आहात,’ असे सांगितले. त्यानंतर त्यांना हॉलमध्ये बसवून त्यांच्या आजूबाजूला हळद व कुंकू टाकले.

Advertisement

तुषार यांनी फिर्यादीला पट्ट्याने मारहाण केली. अॅशलीने त्यांच्या अंगावरून लिंबू ओवाळून काढले आणि त्यांच्या जिभेला, ओठांना उदबत्तीने चटके दिले.

त्यानंतर ३५ हजार रुपये घेतले; तसेच चाकूचा धाक दाखवून आणखी पैसे मागितले आणि पीडितेसह तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement