पुणे: एका तासात 100 मिलीमीटर पाऊस झाला, तर त्याला जागतिक हवामान संघटनेच्या मापकानुसार ढगफुटी घोषित करण्यात येते. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात जवळपास 13 ठिकाणी ढगफुटी झाली.

रडारयंत्रणेअभावी ढगफुटी मोजणे अवघड

ग्रामीण भागात रडारयंत्रणा नसल्याने या पावसाचे मोजमाप करणे शक्य झाले नाही. परंतु, संबंधित परिसरातील पावसाचे एकूण स्वरुप पाहता राज्यात 13 ठिकाणी ढगफुटी झाल्याचा दावा हवामान आयआयटीएमचे हवामानतज्ज्ञ डॉ. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

चारशे मिलीमीटरहून अधिक पाऊस

ताम्हिणी घाटात 468 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. चिपळूण आणि महाबळेश्वरमध्ये अनुक्रमे 400 आणि 480 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, असे हवामानतज्ज्ञ डॉ. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

पवना धऱण परिसरात जोर ओसरला

पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणक्षेत्राच्या परिसरातील पावसाचा जोर ओसरला आहे. पवना धरणातील पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांत 4.99 टक्के तर गेल्या 72 तासांत 31.66 टक्के वाढ झाली.

सध्या पवना धरणात 71.74 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला धरणात 34.96 टक्केच पाणीसाठा होता. गेल्या तीन दिवसांत 579 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

साताऱ्यात पावसाचा जोर कायम

साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरण परिसरात आतापर्यंत दोन हजार 597 मिलीमीटर पाऊस पडला आहे. नवजाला तीन हजार 427 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. महाबळेश्वरमध्ये तीन हजार 209 मिलीमीटर पाऊस झाला.