राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या भाषणात ‘डबल सीट’ चित्रपटाचा उल्लेख केला होता. तोच धागा पकडून, ‘आपलं ट्रिपल सीट सरकार आहे,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
विरोधक कायम सरकावर रिक्षा सरकार, ट्रिपल सीट सरकार असी टीका करीत असताना ठाकरे यांनीही तेच शब्द वापरल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. हे लक्षात येताच ठाकरे यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा केला.
विरोधकांना सणसणीत इशारा
मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा प्रारंभ आज ठाकरे यांच्या हस्ते झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आदी या वेळी उपस्थित होते.
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनबद्दल केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमात ठाकरे काय बोलतात याबद्दल उत्सुकता होती. मुख्यमंत्र्यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधकांना सणसणीत इशारा दिला.
थप्पड से डर नही लगता…
‘मी मुद्दाम तसा उल्लेख करतोय. कारण, अशा टीकेची आता सवय झाली आहे. हल्ली कोणी कौतुक केलं की भीती वाटते. थप्पड से डर नही लगता… असा एका डायलॉग आहे असं सांगून ते म्हणाले, ‘अशा थपडा देत आणि घेत आम्ही इथं आलो आहोत. त्यामुळं कुणी आम्हाला त्या धमक्या देऊ नयेत.’
‘थापडा देत आणि दामदुपटीनं देतच शिवसेना इथवर आली आहे. त्यामुळं आम्हाला कोणी थापडा मारण्याच्या धमक्या देऊ नयेत, नाहीतर अशी एक झापड देऊ की धमक्या देणारे पुन्हा कधी उठणार नाहीत,’ असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला.
बीडीडी चाळींनी दिली उत्तुंग माणसे
‘आयुष्यात काही क्षण अनपेक्षित असतात. मी मुख्यमंत्री होईल याचंदेखील कधी स्वप्न पाहिलं नव्हतं; पण आज मुख्यमंत्री म्हणून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं भूमिपूजन करतोय याचा आनंद आहे,’ असं ठाकरे म्हणाले.
‘बीडीडी चाळींनी मुंबई, महाराष्ट्र व देशाला टॉवरच्या तोडीची उत्तुंग माणसं दिली. त्यामुळं सरकार म्हणून आम्ही कितीही मजली इमारती आणि टॉवर्स बांधले, तरी या चाळींच्या ऋणातून आपण मुक्त होता येणार नाही,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.