मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली असून, सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले आहेत. दरम्यान, ही भेट राजकीय नसून गणेशोत्सव कालपासून सुरु झाला आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणेश दर्शनासाठी पोहचले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हेही कालपासून ठाणे आणि मुंबईतील अनेक सार्वजनिक मंडळे, राजकीय नेते, उद्योगपतींच्या घरी गणेश दर्शनासाठी फिरताना पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांची आज घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

या दोन नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, गणेशोत्सवानिमित्त एक आनंदाचं वातावरण आपण सगळीकडे पाहतो. त्यानिमित्ताने आपण एकमेकांच्या घरी जातो. राज ठाकरे यांची आपण केवळ सदिच्छा भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

राज ठाकरे यांचे ऑपरेशन झालं होतं, त्यावेळीच मी त्यांना भेटणार होतो. पण आता गणेशोत्सवानिमित्ताने त्यांची भेट घेतली.

या दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. तसेच आगामी निवडणुकीच्या संदर्भात कोणत्याही समीकरणाची जुळवाजुळव करण्यात आली नाही.

जुन्या आठवणींना उजाळा….

यावेळी अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज ठाकरे आणि आपण बाळासाहेब ठाकरेंच्या सानिध्यात काम केलेले आहे.

राज यांनीही त्यावेळी शिवसेनेत राज्यात काम केले होते, असेही त्यांनी सांगितले. या भेटीत राजकारणावर चर्चा झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ही भेट नव्या राजकारणाची नांदी आहे का, या प्रश्नावर, भेटीत राजकीय चर्चाच झाली नसल्याने ही नव्या राजकारणाची नांदी कशी ठरेल, असं ते म्हणाले. तसेच, आनंद दिघे साहेबांच्या आठवणी या वेळी चर्चेमध्ये निघाल्या. असल्याचं त्यांनी सांगितलं.