राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ज्या शंभर सदनिकांचे टाटा हाॅस्पिटलला वाटप करण्यात आलं, त्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीत पुन्हा दुरावा निर्माण झाला.

त्यातून सावरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने डॅमेज कंट्रोल करून, दुस-या ठिकाणी शंभर सदनिका देण्यात आल्या.

बाँबे डाईंगमध्ये सदनिका देणार

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या 100 सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली.

Advertisement

या विषयावरुन राजकारण तापल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळत आहे. आव्हाड यांनी माहिती दिली. शंभर सदनिका रुग्णांच्या नातेवाइकांसाठी देण्यात येत आहेत.

काही स्थानिकांनी विरोध केला आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्यानंतर बॉम्बे डाईंगमध्ये शंभर सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.

सामान्यांतून नाराजी

काल मिळालेल्या स्थगितीला आज तेवढ्याच जागा, त्याच परिसरात देऊ शकलो, असंही आव्हाड यांनी म्हटलं. कॅन्सर हॉस्पिटलला दिलेल्या सदनिकांना निर्णय स्थगित केल्यानंतर या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत सत्तासंघर्ष सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता.

Advertisement

तसंच सर्वसामान्य नागरिकांकडूनही या स्थगितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आज डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाला.

नेमकं प्रकरण काय ?

राज्यच नव्हे तर देशभरातून टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक कॅन्सर रुग्ण येत असतात; मात्र त्यांच्या नातेवाइकांना राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवरच राहावं लागतं.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रुग्णांच्या नातेवाइकांची राहण्याची सोय व्हावी, म्हणून म्हाडाच्या शंभर खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. 16 मे रोजी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे शरद पवार यांच्या हस्ते या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या.

Advertisement