Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पुण्यात सीएनजी, पीएनजीचा आता भडका

कोरोना आणि टाळेबंदीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या मध्यमवर्गीयांना चालू वर्षाच्या सुरुवातीपासून इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत.

आता ‘कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस’ (सीएनजी) आणि घरगुती वापराच्या ‘पाइप नॅचरल गॅस’च्या (पीएनजी) दरातही वाढ झाली आहे.

नागरिकांच्या खिशावरील भार वाढणार

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीसह आता सीएनजी किलोमागे ९० पैशांनी आणि पीएनजी एक रुपया ९० पैशांनी महागला आहे.

Advertisement

नवीन दर रविवारपासून (एक ऑगस्ट) लागू झाला आहे. त्यामुळे एक किलो आणि पीएनजीसाठी अनुक्रमे सीएनजीसाठी ५७ रुपये ५० पैसे आणि २९ रुपये १० पैसे मोजावे लागणार आहेत.

व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरातही ७३ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशावरील भार आणखी वाढणार आहे.

डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर

वर्षाच्या सुरुवातीला नव्वदीच्या घरात अससेला पेट्रोलचा दर आता १०७ रुपये ९० पैशांवर गेला आहे. सत्तरच्या घरात असलेले डिझेल आता शंभरीच्या उंबरठ्यावर आहे, तर घरगुती गॅसची (एलपीजी) किंमत ६४४ रुपयांवरून साडेआठशे रुपयांपर्यंत वाढली आहे.

Advertisement

त्यामुळे नागरिकांच्या खिशावर मोठा आर्थिक भार पडला आहे. या सगळ्या परिस्थितीत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली नव्हती; मात्र आता सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे.

‘सीएनजी’च्या मागणीत घट

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात साधारणपणे वाहनांसाठी दररोज साडेचार लाख किलो सीएनजीची मागणी होती; मात्र गेल्या वर्षापासून टाळेबंदी, वर्क फ्रॉम होम आणि रहदारीवरील निर्बंधांमुळे वाहनांची वर्दळ घटली असून, त्याचा परिणाम सीएनजीच्या मागणीवर झाला आहे. सध्या सीएनजीची दररोज साडेतीन लाख किलोंची मागणी असते. ‘पीएनजी’ची मागणी मात्र स्थिर आहे.

सात महिन्यांत १९० रुपयांनी वाढ

सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत सुमारे ७३.५ रुपयांनी वाढ केली आहे. त्यानुसार राज्यात १९ किलोच्या व्यावयासिक वापराच्या सिलिंडरची किंमत १५७९.५९ रुपये झाली आहे.

Advertisement

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती या महिन्यात स्थिर आहेत; मात्र या वर्षात जानेवारीपासून जुलैअखेरपर्यंत एलपीजी (विनाअनुदानित) सिलिंडरच्या दरात १९० रुपयांनी वाढ झाली आहे.

 

Advertisement
Leave a comment