Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

सकाळी तक्रार..संध्याकाळी न्याय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यक्षमता सर्वज्ञात आहे. जागच्या जागी निर्णय घेऊन, त्याची अंमलबजावणी करण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. असा अनुभव फलटणच्या ११ शेतक-यांना आला.

काय करायचं ते करा, पैसे देत नाही जा

फलटण तालुक्यातील ११ शिक्षकांनी निवृत्त झाल्यावर बारामतीमधील खंडोबानगर येथे ग्रुपमध्ये ६० गुंठे जागा विकत घेतली होती. त्यातील ४० गुंठे जागा शहरातील तीन एजंटांच्या माध्यमातून विकली.

त्यानंतर राहिलेली २० गुंठे विकण्याची जबाबदारीसुद्धा शिक्षकांनी त्या तिघांवरच टाकली. त्यांनी २० गुंठे विकली; परंतु फक्त १४ लाख रुपये दिले व राहिलेले एक कोटी २८ लाख ५० हजार उद्या देऊ, आज कायम खूश खरेदी (दस्त नोंदणी) करून द्या, असे विश्वासाने सांगितले.

पहिला व्यवहार उत्तम झाल्याने फलटण शिक्षक ग्रुपने कायम दस्तनोंदणी करून दिले; परंतु काही तासांतच त्या तिघांनी पलटी मारून आता राहिलेली रक्कम देत नसल्याचं सांगून, काय करायचे ते करा, असे सुनावले.

पोलिसी खाक्या दाखवताच वठणीवर

सोमवारी रीतसर दस्त नोंदणी होणार होती. त्यामुळं रविवारी सकाळी पवार यांच्या जनता दरबारात यातील काही जणांनी व्यथा मांडून, न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पवार यांनी उपस्थित अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना या प्रकरणात दोन्ही बाजू व सत्यता पाहून गुन्हेगार असतील, त्यांना ही रक्कम देऊन टाकण्यास सांगा, अशी सूचना केली. त्यानंतर त्वरित तिघांना ठाण्यामध्ये आणून पोलिसी खाक्या दाखवल्यावर दस्त पलटून देण्याचे लिहून दिले.

Leave a comment